दिवस.. रात्र...
पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर पृथ्वीवरच्या माणसांना वेळ काळ याचं काही भानच नव्हतं. तेव्हा विष्णूंनी काहीतरी उपाय शोधावा नवीन काहीतरी बनवावं यासाठी त्यांना विचारणा करण्यात आली. विष्णू विचार करत असताना एका हाताने माती वळण्याचा प्रयत्न करत होते. पण ती माती वळली जात नव्हती..काय करावं बरं ?.. त्यासाठी त्यांनी एक मोठी भट्टी पेटवली आणि जसजशी माती गरम होऊ लागली तसतसा त्याचा गोलाकार बनत गेला. तो एका बाजूला ठेवल्यानंतर हळूहळू पुढे सरकायला लागला. हा पांढऱ्या रंगाचा गोळा सूर्य या नावाने ओळखू लागला. सूर्य बनत असताना बरीचशी माती काळीकुट्ट झाली. त्याचे काळे काळे आभाळ तयार झाले. आता पुन्हा पांढरी माती मळताना देवाने थंडगार पाणी घेतले आणि ही माती थंड पाण्याने कालवण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याचाही गोळा केल्यानंतर एका बाजूला ठेवल्यानंतर हा गोळा पुढे पुढे सरकू लागला. त्याला चंद्र या नावाने ओळखले जाऊ लागले. दोन्ही गोळे जणू एकमेकांना पकडायला निघालेत असे गडगडत चालले. जणू काही लपाछपीचा खेळच खेळतायेत असेही वाटू लागले. सूर्य थांबला की चंद्रही जागेवर थांबायचा. तिथल्या लोकांना अनेक महिने दिवस किंवा रात्र याला तोंड द्यावे लागत होते. आता यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे यासाठी विष्णूंनी त्यांना आदेश दिला. तोपर्यंत पहिल्या गोळ्याची अर्ध्या पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती तर दुसरा गोळा त्याच्या मागून तिथेच जाऊन पोहोचला होता. त्यामुळे एकाच जागी दिवस आणि रात्र दोन्हीही एकत्रच नांदायला लागले. लोक पुन्हा गोंधळात पडले. इथे दिवस आहे का रात्र हेच त्यांना कळेना. चंद्र मागून गेल्यामुळे तिथे अति थंडी निर्माण झाली. यालाच दक्षिण गोलार्ध म्हणतात. दक्षिण गोलार्धात सहा महिने उजेड आणि सहा महिने रात्र अशी साधारण परिस्थिती असते. नेमका दिवस किंवा रात्र असं घडतच नाही. मग मात्र विष्णूंना ही चूक लक्षात आली आणि त्यांनी पृथ्वीच्या अर्ध्या भागात आधी सूर्याला पाठवलं आणि नंतर चंद्राला पाठवलं आणि दोघांना एकमेकांचा सतत पाठलाग करायचा अशी सूचना दिली. अशी ही दोघांची लपाछपी आजपर्यंत अव्याहत चालूच आहे. त्यालाच आपण दिवस म्हणतो आणि चंद्र जाईल त्या ठिकाणाला रात्र म्हणतो. सूर्यामुळे उष्णता मिळते तर चंद्रामुळे थंडावा मिळतो. दोघांना 12-12 तास वाटून दिले. तेव्हा कुठे दिवस रात्र अस्तित्वात आले.