डेव्हिड मिलरकडून सेहवागचा विक्रम मोडीत
लाहोर : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत येथे बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने 67 चेंडूत जलद शतक झळकविले. पण त्याचे हे शतक वाया गेले. कारण न्यूझीलंडने या सामन्यात द. आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पण मिलरने वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताचा सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागने जलद शतक नोंदविण्याचा 23 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. 2002 साली कोलंबोमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सेहवागने 77 चेंडूत शतक झळकविले होते. त्यानंतर यास्पर्धेतील हा विक्रम 23 वर्षे अबाधित राहिला होता. पण मिलरने तो बुधवारी मागे टाकला. 2002 च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सेहवागच्या नावावर आणखी एक शतक नोंदविले गेले होते. द. आफ्रिकेच्या मिलरने आतापर्यंत दोन शतके आणि एक अर्धशतक या स्पर्धेत नेंदविली आहेत.