For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ती सावरली, पण मदतीसाठी हात देईपर्यंत मागून आलेल्या डंपरखाली आई सापडली, अन् डोळ्यासमोरच होत्याचे नव्हते झाले

09:30 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
ती सावरली  पण मदतीसाठी हात देईपर्यंत मागून आलेल्या डंपरखाली आई सापडली  अन् डोळ्यासमोरच होत्याचे नव्हते झाले
Advertisement

कोल्हापूर: बाजारहाट करून दुचाकीवरून आई व मुलगी घरी जात असताना कनाननगर रोडवर दुचाकी स्लिप होऊन पडल्याने पाठीमागून आलेल्या डंपरखाली सापडून शिक्षिकेचा दुर्दैवी अंत झाला. दुचाकीवर मागे बसलेली मुलगी जखमी झाली. हा अपघात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास झाला. अपघातात पूनम रामेश्वर शिंदे (वय ४६ रा. उद्योग भवन शेजारी, कनाननगर, कोल्हापूर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर त्यांची मुलगी एंजल (वय २०) ही जखमी झाली.

Advertisement

पूनम यांच्या अपघाती मृत्युमुळे नातेवाईकांनी सीपीआर परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाननगर परिसरात राहणाऱ्या पूनम शिंदे या घरातच खासगी शिकवणी घेत होत्या. तर त्यांचे पती रामेश्वर शिंदे हे पेंटींग व्यावसायिक असून ते वाहन चालक म्हणूनही काम करतात. त्यांना एंजल (वय २०) व आराधना (वय १७) अशा दोन मुली आहेत. पूनम यांचे माहेरही कनाननगरच आहे. सोमवारी सकाळी पूनम व एंजल या दोघी दुचाकीवरून दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून परत घरी येत असताना कनाननगर परिसरात एका वळणावर त्यांची दुचाकी घसरली, दुचाकी चालवणाऱ्या पूनम रस्त्यावर खाली पडल्या, यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरचे पाठीमागचे चाक त्यांच्या अंगावरून गेले, तर मुलगी दुसऱ्या बाजुला पडल्याने ती किरकोळ जखमी झाली.

डंपर चालकाचे पलायन
अपघात झाल्यानंतर डंपर चालक तेथून पळून गेला. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पूनम यांचा अपघात झाल्याचे कनाननगर येथील लोकांना समजल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी तातडीने पूनम व एंजल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी पूनम यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत केले. जखमी एंजलवर उपचार सुरू आहेत. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तर सीपीआरमध्ये मृत पूनम यांच्या नातेवाईकांचा जबाब घेऊन मृतदेह शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पूनम शांत, संयमी व हुशार होत्या. घराला हातभार लावण्यासाठी त्या घरातच शिकवणी घेत होत्या. तसेच घरगुती उद्योग करून त्यातूनही चार पैसे कमवून मुलींच्या शिक्षणाला मदत करत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सीपीआर आवारात नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

Advertisement

खड्डा चुकवताना दुचाकी घसरली
पूनम शिंदे एंजलला घेऊन दुचाकीवरून खरेदीला गेल्या होत्या. खरेदी आटोपून त्या परत घरी येत होत्या. सासने ग्राऊंड नजिकच्या रस्त्यावर खड्डा चुकवताना त्यांची दुचाकी घसरली. अपघातादरम्यान, एंजल सावरली, पण ती आईला मदतीसाठी हात देईपर्यंत मागून आलेल्या डंपरखाली आई सापडली, अन् लेकीसमोरच आईचा बळी गेला. एंजलचा आक्रोश पाहून घटनास्थळी जमलेल्या लोकांचे हृदय पिळवटले. अपघातानंतर परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होतं. पण सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता. या खड्यांना जबाबदार कोण? एका खड्ड्याने दोन मुलीच्या डोक्यावरचं आईचं छत्र हिरावून घेतलं. तिच्या टाहोसमोर प्रशासनाची उत्तरं निरुत्तर आहेत.

Advertisement
Tags :

.