लेक महत्त्वाची की मार्क्स, शिक्षक पित्याच्या कृतीने समाजमन सुन्न
आटपाडी / सूरज मुल्ला :
मुलांनी डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, ही पालकांनी अपेक्षा सार्थ असली तरी अपेक्षाभंगाचा फटका कसा बसू शकतो, हे आटपाडी तालुक्यातील एका घटनेने जगासमोर आणून दिले. कॉलेजमधील सराव टेस्टमध्ये फक्त कमी मार्क मिळाल्याने झालेल्या शाब्दिक चकमकीत साथना घोंडीराम भोसले या सतरा वर्षाच्या मुलीचा शिक्षक असलेल्या बापाने केलेल्या मारहाणीत बळी गेला. या घटनेने 'लेक महत्वाची की मार्कस्? असा सवाल उपस्थित झाला आहे.
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील साधना धोंडीराम भोसले (१७) या मुलीला शिक्षक वडील धोंडीराम भगवान भोसले यांनी कमी गुण मिळाल्याने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत तिना मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर मुलीच्या खुनप्रकरणी शिक्षक वडीलावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने एक कुटुंब पुर्णपणे उदध्वस्त झालेच. शिवाय परीक्षेतील गुण, वाढत्या अपेक्षा, मुलांच्या जबाबदाऱ्या, गुणांसाठी होणारी जीवघेणी स्पर्धा, पालक पाल्य यांच्यातील संपलेला मुक्त संवाद असे अनेक सवाल समाजाला विचार करायला भाग पाडताहेत.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पालकाला आपल्या पाल्यांनी यशस्वी व्हावे आणि डॉक्टर बनावे, अशी अपेक्षा असणे गैर नाही. परंतु त्यासाठी कॉलेजमधील नियमीत टेस्टमधील गुणाच्या कारणावरून एखाद्या बाळाचा जीव जाईपर्यंत मारहाणीची घटना संतापजनकच ठरली आहे. शिक्षक हा समाजातील एक प्रतिष्ठीत घटक समजला जातो. त्यांच्याकडून पालकांना, विद्यार्थ्यांनाही मोठ्या अपेक्षा असतात. परंतु हे करत असताना आपल्या पाल्याच्या गुणांमुळे वेदना होण्याची व त्यातून सर्वस्व हरवुन घेण्याची घटना विचारमंथन करायला लावणारी आहे.
दहावीमध्ये नेलकरंजीच्या हायस्कुलमध्ये पहिली येणारी साधना भोसले हीला कॉ लेजमधील टेस्टमध्ये कमी गुण मिळणे शिक्षक असलेल्या वडीलांना न रूचणारी गोष्ट होती. या वांदगात मुलीनेच बापाला गुणांवरून दिलेले उत्तरही 'त्या' बापाच्या आत्मसन्मानाला ठेच लावणारी गोष्ट ठरली. आणि त्यातुन नको तेच घडले.
आजची पिढी घडवत असताना आपण 'माणूस' न घडवता 'यंत्र' घडवत असल्याचीच स्थिती आहे. वाढत्या स्पर्धेत आपल्या मुलांनी मागे राहू नये, अशी पालकांची भुमिका असते. त्यातून जबरदस्तीने अनेक अपेक्षांचे ओझे मुलांवर लादले जाते. त्याच्या क्षमतेचा विचार न करता किंबहुना मार्क्स म्हणजेच त्याच्या आयुष्याच्या स्पर्धेतील शेवटचा क्षण बनविण्याचे काम समाजात घडले आहे.
शिक्षण महत्त्वाचे असले तरी दबावतंत्रातील शिक्षणाच्या स्पर्धेत सर्वांनीच पहिले यावे, अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. 'मेरिट लिस्ट'मुळे अनेकांचे जीवन बरबाद झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. बदलत्या स्पर्धेत शैक्षणिक धोरणांमुळे, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळे शिक्षणाला स्पर्धेचे रूप आले आहे. या स्पर्धेत कदाचित 'साधना' मागे पडणारच नव्हती. फक्त कॉलेजमधील अंतर्गत टेस्टचे निमिताने झालेली मारहाण अनियंत्रीत रागाचाच परिणाम आहे.
मागील काही वर्षात आटपाडी तालुक्यातील अनेक मुले-मुली स्पर्धा परीक्षेतून उच्चपदस्थ अधिकारी बनले आहेत. फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरिंगसाठी स्पर्धेत उतरणाऱ्या मुलांना अन्य पर्यायांची कल्पना आपले शैक्षणिक धोरण देतच नाही. शिवाय शाळा, कॉलेज, पालक, मार्गदर्शक शिक्षक देखील अशा जनजागृतीपासुन कोसो दूर आहेत. त्यामुळे मुलांपेक्षा मार्क्स पालकांना किती प्रिय आहेत? याची प्रचिती नित्यनियमाने येते. आज वयाच्या पाचव्या वर्षापासून चिमुकली मुले काहीही समजण्यापुर्वी भविष्यकालीन स्पर्धेसाठी आई-वडीलांपासून कित्येक मैल दूरवर अकॅडमी, निवासी शाळांमध्ये हरविले आहेत. हे करत असताना निश्चितच पालकांनाही आनंद होत नाही. परंतु खेळण्या बागडण्याच्या वयातही स्पर्धेसाठी मुलांना यंत्रवत हाताळणे हा सामाजिक रोगच बनला आहे. मागील आठवड्यात इचलकरंजीमध्ये इयत्ता बारावीच्या एका मुलाने अकॅडमीमध्ये आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. त्यानंतर नातेवाईक, पालकांनी 'त्या' कॉलेजमध्ये मोडतोड केली. आज नेलकरंजीमध्ये साधना भोसले ही मुलगी शिक्षक वडीलांच्या मारहाणीची बळी ठरली.
असे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मरण अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ञांची विद्यार्थ्यांसह पालकांनाही गरज निर्माण झाली आहे. स्वप्ने पाहणे वाईट नाही. परंतु त्या स्वप्नांना साकार करताना एखाद्या मुलाला प्रोत्साहन देण्याऐवजी तिचा बळी जाईल इतकी मारहाण होणे आणि त्या पाठीमागे शिक्षक असलेल्या वडीलाचा न उलगडणारा आक्रमकपणा स्पष्ट झाला आहे. या घटनेने बापाचा निर्दयीपणा पाहून समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटाहेत.
विद्यार्थ्यांना यशासाठी विविध स्पर्धांना सामोरे जावे लागत असले तरी पालकांनाही मार्गदर्शन करण्याची सोय करावी लागणार आहे. अन्यथा जीवनापेक्षा मार्क्स श्रेष्ठ ठरतील आणि अनेक बालकांचा असाच बळी जाईल.
- बालपण हरवतंय
आजच्या काळात मुलांकडून असणाऱ्या मोठ्या अपेक्षांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी मार्क्स हेच अंतिम सत्य बनले आहे. त्यात नेलकरंजीमध्ये चक्क मुलीचाच बळी गेल्याने लेकीपेक्षा मार्क्स श्रेष्ठ ठरले. इयत्ता पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षांनी वेग घेतला आहे. शासकीय व खासगी स्पर्धा परीक्षांनी डोके वर काढले आहे. अकॅडमींची भाऊगर्दी झाली आहे. मुलांचे बालपण पुस्तकांमध्ये हरवले आहे. शिक्षण गरजेचे असले तरी जीवघेणे शिक्षण आणि जीवघेण्या अपेक्षा समाजासाठी घातकच आहेत.