चापगाव येथे दौडीमुळे चैतन्यमय वातावरण
खानापूर : तालुक्यातील चापगाव येथे नवरात्रीनिमित्त दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत आहे. रोज पहाटे 5.30 वा. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दुर्गामाता दौडीला सुरुवात करण्यात येते. चापगाव परिसरातील शिवोली, अल्लेहोळ, वड्डेबैल यासह चापगाव गावात दौड काढण्यात येते. नवव्या दिवशी पहाटे शिवाजी महाराजांचे पूजन करून दुर्गा दौडीला सुरुवात करण्यात आली. श्री फोंडेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री चव्हाटा मंदिर, श्री संत नारायण मंदिर तसेच संपूर्ण गावांमधून दौड काढण्यात आली. यावेळी युवक, युवतींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गल्लोगल्ली रांगोळ्या, भगव्या पताका तसेच ध्वज उभारून दौडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. धर्मवीर संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. दुर्गामाता मंदिरात दुर्गा दौडीची सांगता झाली.