दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दिलासा
नांदेड/वाशिम : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून शक्य तितकी भरीव मदत आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
कृषीमंत्री भरणे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत विविध भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पावसाअभावी झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे भरणे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच आवश्यक त्या उपाययोजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची अधिकृत माहिती संकलित करून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. काही भागांत चारा व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची शक्यताही निर्माण झाली असून त्याबाबतही उपाययोजनांचा विचार सुरू असल्याचे भरणे यांनी सांगितले.