Narsobachi Wadi : कृष्णा-पंचगंगा नद्यांची पाणी पातळी ओसरली; दत्त मंदिर भाविकांसाठी खुले
राधानगरी -गेल्या तीन दिवसापासून राधानगरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्या पात्राकडे जात आहेत. कृष्णा पंचगंगेची पाणी पातळी ओसरल्याने येथील दत्त मंदिर तब्बल सहा दिवसांनी शनिवारी सायंकाळी दर्शनासाठी खुले झाले आहे. तर कुरुंदवाड इचलकरंजी शिरढोण मार्गे पंचगंगा नदीवरील शिरढोण पूल खुला झाल्याने चार दिवसानंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. याचबरोबर कृष्णा नदीवरील जुना औरवाड पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरम्यान पंचगंगेची पाणीपातळी कमी होत असली तरी येथील संगमावरील कुरुंदवाड घाटावर असणारी सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी अद्याप पाण्यातच आहे...
दत्त देवस्थान कर्मचारी व सेवेकरांच्या मार्फत मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शनिवारी दुपारनंतर पाणी ओसरण्याची गती वाढल्याची वार्ता सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरल्याने शेकडो दत्त भक्तांनी शनिवारी रात्री दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.दरम्यान कृष्णा पंचगंगेचे पाणी झपाट्याने ओसरत असल्याने सध्या तरी महापुराचा धोका टळल्याने नदी काठावरच्या पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी दुपारी 'उतरता दक्षिण द्वार' सोहळा
मंगळवारी पहाटे येथे दक्षिण द्वार झाल्यानंतर सोमवार रात्रीपासून मंदिर दर्शनासाठी बंद झाले होते. ते शनिवार सायंकाळी पासून दर्शनासाठी खुले झाले आहे. याचबरोबर येथे कृष्णा पंचगंगेची पाणी पातळी उतरत असताना शनिवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान 'उतरता दक्षिण द्वार' झाला. शनिवार असल्यामुळे शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला.
पाण्यातून पालखी सोहळा
शनिवारी दुपारी दक्षिणद्वार झाल्यानंतर सायंकाळपासून मंदिर दर्शनासाठी खुले झाले. नित्य नियमाप्रमाणे रात्री ७.३० नंतर धूप,दीप, आरती व गुडघाभर पाण्यातून श्रींचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला गुडघाभर पाण्यातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.