खानोली-सुरंगपाणी येथे उद्या दत्तजन्मोत्सव सोहळा
आ. दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
वेंगुर्ले (वार्ताहर)-
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानात असलेल्या श्री दत्त मंदिरात दत्तजयंतीचे औचित्य साधून दि. १४ डिसेंबर पर्यत होत असलेल्या गुरूचरित्र पठण व दत्तजन्म च्या कार्यक्रमांस शनिवारी सायंकाळी राज्याचे मावळते शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दिपकभाई केसरकर हे खास उपस्थित राहणार आहेत.खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानात असलेल्या श्री दत्त मंदिरात दत्तजयंतीचे औचित्य साधून श्री विठ्ठल पंचायतनातील येथील पावित्र्य अबाधित राहाण्यासाठी रविवार दि. ८ ते १४ डिसेंबर काळात गुरुचरित्रपठण व धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता गुरूचरित्र्य पारायणाची समाप्ती, १०.३० वाजता रूपेश परब बुवा यांचा नामस्मरण कार्यक्रम, दुपारी आरती, नैवेद्य, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्मसमयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान व आरती, सायंकाळी दत्तमहाराजांवर आधारीत 'परकाया प्रवेश' हे नाईक मोचेमाडकर दशावातारी मंडळाचे नाटक होणार आहे. तर रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सत्त्यदत्त पुजा, दुपारी आरती, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अर्चना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी दत्तजन्म उत्सवाबरोबरच दशावतारी नाटकाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.