दास यांची अटक अन्यायकारक !
शेख हसीना यांची प्रतिक्रिया : हिंदूंवरील हल्ल्याचा निषेध
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बांगलादेशात इस्कॉनचे माजी प्रमुख आणि महत्वाचे हिंदू नेते चिन्मोय कृष्णदास यांना झालेले अटक ही अन्यायपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया त्या देशाच्या पदच्युत पंतप्रधान आणि सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या नेत्या शेख हसीना यांनी व्यक्त केली आहे. बांगला देश प्रशासनाने त्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा त्यांनी तीव्र निषेध केला असून ते त्वरित थांबविले जावेत अशीही मागणी केली. काही दिवसांपूर्वी बांगला देशात न्यायालयाच्या परिसरातच एका वकिलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचाही त्यांनी निषेध केला. ज्यांनी ही हत्या केली ते दहशतवादी आहेत. त्यांना त्वरित शोधले जावे आणि कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी. बांगलादेशात सध्या अराजकसदृश परिस्थिती असून दुष्ट शक्तींची मनमानी चालली आहे, अशीही टीका त्यांनी गुरुवारी केली.