For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ दशावतारी कलावंत नाना गावकर यांना दशावतार जीवन गौरव पुरस्कार

12:17 PM Mar 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ज्येष्ठ दशावतारी कलावंत नाना गावकर यांना दशावतार जीवन गौरव पुरस्कार
Advertisement

पणजी येथील कला व संस्कृती संचालक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

ओटवणे येथील प्रसिद्ध कलाकार आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांच्या दशावतार कलेतील गेल्या पाच दशकातील योगदानाची दखल घेऊन त्यांना गोवा येथील आर्ट्स टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती आणि श्री नागेश महारुद्र फाउंडेशनचा दशावतार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पणजी येथील कला व संस्कृती संचालक भवनात राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याहस्ते नाना गावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, गोव्याचे आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, प्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. उल्हास प्रभू देसाई, अहिल्यानगरच्या रणरागिनी संस्थेच्या अध्यक्ष रोहिणी पवार, नागेश महारुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांनी नाना गावकर यांच्या दशावतारी कलेचा गौरव करीत त्यांच्या उत्तम व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता सातवीनंतर शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे नाना गावकर यांनी शाळा सोडली. दशावतार कलेची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ओटवणे गावातील नाना गावकर यांच्यातही लहानपणापासूनच दशावतार कलेची आवड निर्माण झाली. त्यामुळे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून नाना गावकर दशावतारी कलेत आहेत. सुरुवातीला त्यांनी ओटवणे दशावतार कंपनीत आरती आणि रिद्धी सिद्धी चे काम केले. त्यानंतर प्रसिद्ध दशावतारी कलाकार कै महादेव भैरवकर यांच्या सहकार्याने पार्सेकर दशावतार कंपनीमध्ये सुमारे १० वर्ष हमाली केली. त्यावेळी दिवसाला १ रुपया ५० पैसे मिळायचे. दिवसा हमाली केल्यानंतर रात्री झांज वाजवण्याचा एक रुपया मिळायचा. हमाली दिवसा दोन रुपये झाल्यानंतर प्रत्येक दिवशी तीन रुपये मिळायचे. पायी प्रवास करतानाच 'रात्रीचा राजा सकाळी डोक्यावर बोजा' अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दशावतार कलेची सेवा करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यांनी आजगावकर, मोचेमाडकर, बोर्डेकर, गोरे, चेंदवणकर आदी अनेक दशावतारी कंपन्यांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारताना आरोलकर दशावतार कंपनीत सर्वाधिक काम केले. उल्लेखनीय म्हणजे अष्टपैलू कलाकार असलेल्या नाना गावकर नारद आणि स्त्री पार्ट वगळता सर्व भूमिकांना यशस्वीपणे साकारल्या. त्यांना कुठलीही भूमिका दिली तरी ते त्या पत्राला न्याय देत प्रेक्षकांची मने जिंकत. त्यांची दुर्योधनची भुमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या दशावतारी कलेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. त्यांच्या या कलेचा वारसा आता त्यांचे सुपुत्र प्रल्हाद गावकर आणि शंकर गावकर यशस्वीपणे पुढे चालवीत आहेत. नाना गावकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.