For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दारूक द्वारकेत येऊन ओक्साबोक्शी रडू लागला

06:07 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
दारूक द्वारकेत येऊन  ओक्साबोक्शी रडू लागला

अध्याय एकतिसावा

Advertisement

शुकमुनी म्हणाले, साधनाचे अतिशय श्रम करूनही ब्रह्मज्ञान मिळण्याची खात्री देता येत नाही पण श्रीकृष्णपदवीच्या चौदा श्लोकांचे श्रद्धेने श्रवण, पठण केले तर पठण करणाऱ्याला श्रीकृष्णपदवी मिळाल्याने ब्रह्मज्ञान विनासायास पदरात पडते. साधक परिपूर्ण ब्रह्म झाल्यामुळे नीजनिर्वाणही साधले जाते. देही असून विदेही अवस्था प्राप्त होण्यासाठी हा सुगम उपाय शुकमुनींनी परीक्षित राजावर कृपा करून प्रतिज्ञापूर्वक सांगितला.

ज्याची ह्यावर श्रद्धा बसणार नाही तो त्याच्या उद्धाराची संधी गमावून बसेल आणि त्यामुळे संसारसागरात बुडून जाईल. त्यामुळे अज्ञानाच्या आहारी जाऊन विषयसेवन करण्यामध्येच तो धन्यता मानेल. असो ह्या मूर्ख लोकांच्या गोष्टी फार काळ न बोललेल्याच बऱ्या कारण कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो. तेव्हा आपल्या सुखावर आपणच लाथ मारायला नको. हे श्लोक पठण केले की ब्रह्मज्ञान प्राप्त होते एव्हढी एकच गोष्ट आपण लक्षात ठेऊयात.

Advertisement

आत्तापर्यंत शुकमुनींनी सांगितलेले कृष्णनिजपदवी व्याख्यान नाथमहाराजांनी आपल्याला सविस्तर विवरण करून सांगितले. पुढे ते म्हणतात, मी हे आख्यान सांगितले खरे पण त्याचे वर्णन करण्याला मीअसमर्थ आहे तरीही मी ते सांगू शकलो कारण माझे सद्गुरू श्री जनार्दनस्वामी ह्यांनी कृपा करून हे निरूपण माझ्याकडून वदवून घेतले. मी त्यांना शरण आहे.

Advertisement

श्रीकृष्णपदवीच्या निरुपणाने भागवताच्या एकादश स्कंधावर कळस चढवला आहे. श्रीव्यासमुनींनी हे जाणून बुजून केले आहे कारण ह्यापेक्षा अन्य कोणताही उत्तम पद्धतीने कळस चढवता आला  नसता. ह्याप्रमाणे श्रीकृष्णाचे निजधामाला जाण्याचे आख्यान श्री जनार्दनमहाराजांच्या कृपेने पूर्ण झाले. इकडे भगवंतांनी आज्ञा केल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा सारथी दारूक दु:खीकष्टी अंत:करणाने द्वारकेला गेला. तेथे पुढे काय काय घडले ते परीक्षित राजाला शुकमुनी पुढे सांगत आहेत.

ते म्हणाले, श्रीकृष्ण तेथे नसल्याने त्याला द्वारका म्हणजे प्राण गेलेले प्रेत वाटले. एखाद्या नगरीचा राजा दैवाने ओढून नेल्यामुळे ती नगरी जशी कळाहीन होते तशी द्वारका त्याला कळाहीन वाटली. एखाद्या पत्नीचा नवरा वारल्यावर तिला काही सुचेनासे झाल्याने तिची अवस्था दीनवाणी होते त्याप्रमाणे द्वारका त्याला दीनवाणी वाटली. रस पिळून काढल्यावर उसाचे चिपाड जसे दिसते किंवा तांदळाच्या ओंब्या झोडून काढल्यावर निव्वळ भुसा उरतो तशी श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीमुळे द्वारका दिसत होती.

अशा ह्या अनाथ, कळाहीन द्वारकेमधील राजभवनात दारुकाने प्रवेश केला. श्रीकृष्णाचे वडील वसुदेव आणि आजोबा उग्रसेन ह्यांच्याकडे बघून त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. तो ढसढसा रडू लागला. अत्यंत दु:खाने आक्रंदन करून त्याने त्यांचे पाय पकडले. कृष्णवियोगाचे त्याला अपरंपार दु:ख झाल्याने तो पोळला होता. त्याचे कढत अश्रू वसुदेवाच्या पायावर पडल्याने वसुदेवाचे पाय पोळून निघाले. दारूकाच्या ओक्साबोक्शी रडण्याने जणू त्याच्या हृदयाचा स्फोट होत आहे असे वाटले. त्याच्या जीभेची बोबडी वळली, ओठ सुकले आणि गळा सद्गदित होऊन दाटून आला. त्याला खूप काही सांगायचं होतं पण त्याच्या तोंडून एक शब्द फुटायला तयार नव्हता. दारुकाची ही अवस्था बघून द्वारकेतील सर्व प्रजाजन अतिव्याकुळ झाले.

देवकी आणि रोहिणी अत्यंत हडबडून गेल्या. ह्या सर्वाची व्यथा अंत:पुरात असलेल्या श्रीकृष्णनाथांच्या राण्यांच्या कानावर गेली. ती ऐकून त्याही सत्वर तेथे धावत आल्या. राणीवशातले सर्व दासदासी सभामंडपात दाखल झाले. दारुकाची अवस्था बघून ते सर्वजण दचकून गेले. स्फुंदत स्फुंदत दारुकाने कृष्णवियोगाची वार्ता त्या सर्वांच्या कानावर घातली.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.