महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दाम करी काम’... कोण घालणार लगाम?

06:30 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारागृहे सुधारगृहे झाली पाहिजेत, असे महात्मा गांधी म्हणायचे. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला चित्रपट अभिनेता दर्शन व त्याच्या साथीदारांची बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात ठेवलेली बडदास्त पाहता कारागृहे सुसज्ज उपाहार आणि वसतीगृहे झाली आहेत, हे लक्षात येते. अभिनेता दर्शन बेंगळूर येथील गुंड विल्सन गार्डन नागा ऊर्फ नागराज, कुळ्ळ सिना व दर्शनचा साथीदार नागराज आदी कारागृहात खुर्चीवर बसून कॉफी पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कॉफी घेताना दर्शन धूम्रपान करताना दिसतो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेच आणखी एक व्हिडिओ बाहेर पडला. या व्हिडिओमध्ये बेंगळूर येथील एका गुंडासोबत दर्शन व्हिडिओ कॉलवरून बोलताना दिसतो. एक फोटो आणि एका व्हिडिओमुळे बेंगळूर येथील परप्पन अग्रहारसह कर्नाटकातील वेगवेगळ्या कारागृहात नेमकी काय परिस्थिती आहे? हे पहायला मिळते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गृह खात्यावरही टीका होऊ लागली आहे.

Advertisement

दर्शनची बडदास्त ठेवणाऱ्या कारागृहातील मुख्य अधीक्षक व अधीक्षकांसह नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे. एखादे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. नंतर साऱ्यांनाच या प्रकरणांचा विसर पडतो. केवळ परप्पन अग्रहारमध्येच कैद्यांची बडदास्त ठेवली जाते का? स्वातंत्र्यपूर्व काळातील बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील अनेक कारागृहात परिस्थिती काय आहे? यावर चर्चा होऊ लागली आहे. दर्शन व त्याच्या साथीदारांचा व्हायरल झालेला फोटो लक्षात घेता दर्शन कारागृहात आहे की रिसॉर्टमध्ये? असा प्रश्न पडतो. रेणुकास्वामीच्या वडिलांनीही दर्शनची बडदास्त ठेवणाऱ्या कारागृह व्यवस्थापनावर आक्षेप घेतला आहे. एखाद्या गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, त्याला अद्दल घडावी, त्याच्यातील क्रूरपणा संपुष्टात येऊन तो माणूस व्हावा म्हणून त्याला बंदिस्त ठेवले जाते. परप्पन अग्रहारमधील परिस्थिती लक्षात घेता कैद्यांना शिक्षा देण्याची व्यवस्था अशीच असते का? की पैशापोटी या व्यवस्थेत बदल झाला आहे? असा प्रश्न पडतो.

Advertisement

कारागृह कोणत्याही राज्यातील असो वा कोणत्याही जिल्ह्यातील असो. परिस्थितीत खूप काही बदल आहे, असे वाटत नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे, जो बाहुबली आहे तो आपल्याला हवे ते मिळवू शकतो. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता व त्यांची मैत्रीण शशीकला यांनाही याच परप्पन अग्रहार कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. त्यावेळीही कारागृह व्यवस्थापनाने त्यांची बडदास्त ठेवल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना नव्हता. केवळ वृत्तपत्रे व साप्ताहिकांमधून यावर चर्चा झाली. त्यावेळीही कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. पुन्हा व्यवस्था आहे तशीच राहिली. दर्शनची बडदास्त ठेवली म्हणून नऊ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करून व्यवस्थेत बदल होणार आहे, कारागृहातील व्यवस्था सुधारणार आहे का, याचे उत्तर नाही असेच येते. सत्ता कोणाचीही असो, कारागृहात जाणारा गुन्हेगार किती मोठा आहे, यावर त्याला कोणत्या सुविधा मिळतात, हे ठरते. प्रत्येक सेवेचा एक दर ठरलेला असतो. पैसा मिळाला की कैद्यांना सहजपणे सुविधा मिळतात.

फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेणुकास्वामी खून प्रकरणातील दर्शनसह त्याच्या सर्व साथीदारांना कर्नाटकातील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यांना हलवल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत नाही. सध्या चाललेली चर्चा थांबली की व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येते, असा आजवरचा अनुभव आहे. राजकीय नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी चित्रपट अभिनेत्यांची मदत घ्यावी लागते. अनेक नेत्यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्यांचा वापर करण्यात आला आहे. या उपकाराची परतफेड राजकीय नेतेही अशा अडचणीच्यावेळी करीत असतात. पोलीस, महसूल, कारागृह किंवा इतर कोणत्याही खात्यात बदलीसाठी राजकीय नेत्यांचे पत्र हे लागतेच. पत्र घेऊन स्वत:ची बदली आपल्याला हव्या त्या ठिकाणी करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना नेते जे सांगतील ते ऐकावे लागते. दर्शन प्रकरणातही असेच झाले आहे. परप्पन अग्रहार कारागृहात पाच हजारहून अधिक गुन्हेगारांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. बेंगळूर येथील अनेक नामचीन गुंडही या कारागृहात आहेत. दर्शनची सेवा कोणी करायची? त्याचा जवळचा कोण? याविषयी तर गुन्हेगारांमध्ये चढाओढ लागलेली आहे. या चढाओढीतूनच दर्शनच्या अडचणी वाढल्या आहेत. विल्सन गार्डन नागा ऊर्फ नागराज याला कारागृहात आपले वजन किती आहे? हे दाखवायचे होते. त्यामुळेच एखाद्या रिसॉर्टप्रमाणे टेबल-खुर्च्या मांडून दर्शनला त्याने चहापानाला बोलावले होते. याचा मोठेपणा दाखविण्यासाठीच कारागृहातील एका कैद्याने तो फोटो काढून आपल्या पत्नीला पाठवला. पत्नीने तो स्टेटसवर ठेवला, त्यामुळे संपूर्ण कारागृह व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे रहावे, इतकी यावर चर्चा घडली.

बेंगळूर, बेळगावसह राज्यातील सर्व कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कारागृहात मोबाईल वापरू नये म्हणून जामर बसविण्यात आले आहेत. सरकारी नियमानुसार जामर बसविण्यात आले असले तरी ते बंद आहेत किंवा काही वेळापुरते ते बंद केले जातात. कैद्यांना सुविधा पुरविण्यासाठी, त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी कारागृह अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मोजावी लागते. ही श्रीमंती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्येही चढाओढ सुरू असते. प्रत्येक कारागृहात कैद्यांसाठी कँटीन असते. या कँटीनमध्ये त्यांना खाद्यपदार्थ मिळतात. तंबाखू, विडी, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या कैद्यांना कँटीनमध्ये आपले सर्व साहित्य मिळते. त्यांना ते मिळाले नाही तर त्यांची मन:स्थिती बिघडते. त्यांना आवरणे अवघड होते. म्हणून अधिकारी तिकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा कारागृह अधिकाऱ्यांचीही चांगलीच पंचाईत होते. कैद्यांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक त्याच्यासाठी जेवण, फळे, फराळ आणलेले असतात. ते आत सोडले नाही तर कैद्यांचा थयथयाट वाढतो. नातेवाईकही नाराज होतात. सोडले तर काही वेळा कारवाईला सामोरे जावे लागते. अशा विचित्र अवस्थेत कारागृह विभागातील अधिकाऱ्यांना काम करावे लागते. या विभागात सर्वच अधिकारी बरबटलेले नाहीत. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारीही आहेत. मात्र, पैशांसमोर त्यांचेही काही चालत नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article