तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद
पेड व धर्मदर्शन दहा दिवसांसाठी बंद
तुळजापूर :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५ या कालावधीत धर्मदर्शन आणि पेडदर्शन बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर संस्थानकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सध्या श्री तुळजाभवानी मंदिर व शहर विकास आराखड्याअंतर्गत, केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून १८६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत, मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून ५८ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. याच अनुषंगाने १ ऑगस्टपासून १० ऑगस्ट २०२५ पर्यंत सिंहासन गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम केले जाणार आहे.
या कालावधीत जरी धर्मदर्शन व पेडदर्शन बंद असले, तरी दैनंदिन धार्मिक विधी, अभिषेक पूजा, सिंहासन पूजा आणि मुखदर्शन हे नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे.
भाविक भक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे पेड आणि धर्मदर्शन दहा दिवस बंद