धाडसा! तुझे नाव रेवती
देशातील हा न्याय निवाडा पहिल्यांदाच झालेला आहे. जनतेचे आपण रक्षक आहोत याचे भान अधिकाऱ्यांनी विसरता कामा नये. प्रत्येक ठिकाणी जनतेला न्याय देण्यासाठी रेवती उभी राहू नाही शकत. परंतु या संपूर्ण घटनेतून धाडस म्हणजे रेवती आणि रेवती म्हणजे धाडस, असेच समीकरण होईल. मिळनाडूतील तुतीकोरीन जिह्यातील सथानकुलम पोलीस स्थानकातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदुराई न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने या देशात आजही न्यायपालिका तेवढीच मजबूत आहे व कोणालातरी निश्चितच न्याय मिळेल, अशी आशा त्यामुळे पल्लवीत झाली आहे. पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे, कायद्याचे रक्षक आहेत अशी आपली सर्वांची भावना असते, मात्र कित्येक पोलीस त्यांना मिळालेल्या अधिकाराचा जास्तीत जास्तपणे दुऊपयोग करीत असल्याचे दिसून येते. जे काही अत्यंत प्रामाणिक कर्मचारी आहेत त्यांना कधीही राजकीय आश्रय मिळत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे राहिल्याचा व वागल्याचा त्यांना नेहमीच त्रास होतो. पाच वर्षांपूर्वी कोविडच्या काळामध्ये सथानकुलम या गावात संचारबंदी असताना काही जणांच्या विनंतीनुसार पी. जयराज यांनी आपले भ्रमणध्वनीचे दुकान खुले ठेवले. पोलिसांनी त्याला यथेच्च बडविले. त्यामुळे आपल्या बापाला कशाला बडवता म्हणून त्याचा मुलगा जे. बेनिक्स हा मदतीला धावून आला. पोलिसांनी त्यालाही रक्तबंबाळ केले. त्यानंतर तेथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. अक्षरश: नग्न केले आणि त्यांच्या शरीराचे पडलेले रक्त देखील त्यांनाच पुसायला लावले. या सर्व घटनेची एकमेव साक्षीदार ठरली ती तेथील हेड कॉन्स्टेबल रेवती. तिने त्या दोघांना कॉफी आणली, तर एका पोलिस अधिकाऱ्याने तिचा हात झिडकावरून कॉफी फेकून दिली. त्यांना पुन्हा एकदा मारहाण केली. गंभीर परिस्थितीत त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. तिथे त्या दोघांचे निधन झाले. या प्रकरणाने संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्वच पोलीस काही एवढे निष्ठुर नसतात. त्यातील एक कॉन्स्टेबल रेवती. तिने आपल्यासाठी व कुटुंबासाठी अभय मागून घेत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना कथन केली. याप्रकरणी सीबीआयने दोन हजार पानी आरोपपत्र पोलिसांच्या विरोधात न्यायालयात दाखल केले. मद्रास उच्च न्यायालयाने रेवतीला पूर्ण संरक्षण देण्यास सांगितले. या प्रकरणाचे सीसी टीव्ही फुटेज देखील प्राप्त केले. त्यामध्ये ज्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, मुख्य कॉन्स्टेबल व इतर मिळून नऊ पोलिसांनी ज्या पद्धतीने या दोन्ही बाप व मुलाला क्रूर पद्धतीने मारले आणि त्यांचा छळ केला, त्याबाबतची सविस्तर माहिती देण्यास 37 वर्षांच्या कॉन्स्टेबल रेवती सज्ज झाल्या. आपले काहीही होवो, परंतु सत्य उघडतेच असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान रेवतीला धमक्या देण्यात आल्या. न्यायालयीन चौकशीच्यावेळी देखील खुद्द न्यायालयात पोलीस मोठ्या प्रमाणात जमायचे. त्यांनी न्यायाधीशांवर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या पोलिसांनी खुद्द न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील धमकावले. पाच वर्षांच्या या चौकशीअंती मदुराई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथूकुमार यांनी जो निवाडा दिला तो देशातील हा पहिला निवाडा असेल ज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांना तथा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा देताना न्यायाधीश म्हणतात, “अत्यंत दुर्मीळ अशी ही केस आहे, मात्र ज्यांना अधिकार दिले त्यांनी त्याचा गैरवापर तर केलाच शिवाय नागरिकांच्या हितरक्षणाची जबाबदारीची शपथ घेणाऱ्यांनी नागरिकांचे खून पाडावे व कायदा आणि घटनेने दिलेल्या जबाबदारीचे उल्लंघन करावे हे कदापि मान्य होणार नाही. ज्या पद्धतीने पोलिसांनी क्रूरतेने व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे, त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देणे हेच योग्य ठरते“. सदर जिह्यामध्ये असंख्य पोलीस आहेत, त्या पोलीस ठाण्यावर देखील अनेक अधिकारी, कर्मचारी होते परंतु कोणीही साक्ष देण्यास तयार नव्हते. मात्र रेवती या कॉन्स्टेबलने सत्य परिस्थिती मांडली. त्यामुळेच या पोलिसांना फाशीची शिक्षा ठोठावता आली. कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे या निवड्यातून स्पष्ट होते. निवाडा जेवढा धाडसी आहे, तेवढेच रेवतीचे कामदेखील धाडसी आहे. रेवती ही आधुनिक राणी चन्नम्मा आहे. निवाडा दिल्यानंतर आता या महिलेला किती वर्षे न्यायालय संरक्षण देणार? सत्याला कोणी वाली नसतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये रेवतीच्या मागे जनतेने उभे राहणे आवश्यक आहे. पोलीस अधिकारी झाले म्हणून काय झाले? त्यांनी देखील कायद्यानेच वागले पाहिजे. कायदा हातात घेऊन मुलाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे,त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांनाही शिक्षा तेवढीच आवश्यक ठरते. आज सर्वसामान्यांना पोलीसस्थानकात न्याय मिळणे कठीण होऊन जाते. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात त्यावेळी रेवतीसारख्या जागृत महिलेने जे काम केले तिची इतिहासात निश्चितच नोंद होईल.