हिंमत असेल तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये यासह तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील निकाल काल लागला. पैकी राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा जनमताचा कौल असला तरी तो ईव्हीएमचाही आहे असे वक्तव्य करून ईव्हीएमच्या निकालावर शंका उपस्थित केली. संजय राऊतांच्या या विधानाचा समाचार घेताना अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी संजय राऊतांना आता काम राहीलेलं नाही त्यामुळे त्यांनी जनतेमध्ये जाऊन पहावं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय काम केलं आहे.
पाच राज्या पैकी तेलंगणा या राज्यावर कांग्रेसने सत्ता मिळवली तर राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगढ या राज्यामध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. भाजपच्या या यशानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, "चार राज्यांचा जनादेश समोर आला आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये वेगळा जनादेश आहे. भाजपाने मोठा विजय नोंदवलाय. या जनादेशाचे स्वागत करायला हवं. परंतु लोकांच्या मनात शंका आहे. हे कसं शक्य झालं ? विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. त्यामुळे माझं मत असं आहे की, लोकांच्या मनात शंका असेल तर ती सरकारने दूर करावी. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घ्यावी...फक्त एक निवडणूक घ्यावी आणि देशातील लोकांचा संशय दूर करावा.” अशी मागणी केली.
संजय राऊतांच्य़ा या वक्तव्यावर बोलताना अजित पवार गटाचे बांधकाम आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं आहे ? हे संजय राऊत यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पाहावं. येत्या २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकीतही संजय राऊत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतील." असा मिष्कील टोलाही अनिल पाटलांनी यांनी लगावला आहे.