राष्ट्रीय स्तरावर दापोलीचा झेंडा...धावपटू शिल्पा केंबळे- चव्हाण
अनेकवेळा राष्ट्रीय स्तरावर कोरले जिल्ह्याचे नाव : अनेक पुरस्कारांनी गौरव,सलग चारवेळा राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला खेळाडू
मैदानी खेळ जरी अनेकजण आता विसरत चालले असले तरी काही तारे मैदानाची आवड निर्माण करून जन्म घेत असतात. फक्त त्या क्षेत्रात योग्य गुरू मिळाला की, यश आपलेच असते. रत्नागिरी जिह्यातील दापोली शिर्दे आणि आताचे सासर आगरवांगणी येथील शिल्पा केंबळे- चव्हाण यांनी धावपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावर दापोलीचा झेंडा अनेकवेळा फडकावला आहे. एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर सलग चार वेळा निवड होऊन त्या जिह्यातील पहिला महिला खेळाडूही ठरल्या आहेत.
कोकणात जन्माला आलेल्या शिल्पा केंबळे तथा सई चव्हाण यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा धावपटू म्हणून दापोलीचा, रत्नागिरी जिह्याचा झेंडा फडकवला आहे. शिल्पा यांना लहानपणापासून खेळाची आवड. शालेय स्पर्धांमध्ये त्या उत्साहाने भाग घेत. त्यानंतर महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाच्या माध्यमातून स्पर्धांमध्ये उतरण्यास सुरूवात केली. प्रथम त्या खो-खो खेळत. परंतु त्यांचे प्रशिक्षक असणारे संदेश चव्हाण यांनी त्यांच्यातील धावण्यातील चपळाई ओळखली व त्यांना धावणे क्रीडा प्रकारात सहभागी करून घेतले. शिल्पा यांनी 2018 साली प्रथम राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत ‘धावपटू’ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर 2020, 2021, 2022 अशा सलग तीन वर्षांच्या स्पर्धेत त्या उतरल्या आणि पदके, सन्मानचिन्हे आपल्या पदरात पाडून घेत आपल्या नावाची छबी राष्ट्रीय स्तरावर उमटवत दापोलीच्या शिरपेचात एका मागोमाग एक असे मानाचे तुरे रोवले.
एकंदरीत राष्ट्रीय स्पर्धेत सलग चारवेळा निवड झालेल्या त्या रत्नागिरी जिह्यातील पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या. शिल्पा यांनी सातवीपर्यंत शिक्षण आपल्या जन्मगावी शिर्दे येथील जि. प. शाळेत घेतले. 8 ते 10 वीचे शिक्षण टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे घेतल्यानंतर अकरावीपासून प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण एन. के. वराडकर महाविद्यालयात व द्वितीय वर्ष ते एम. ए. पर्यंतचे शिक्षण मुंबई उल्हासनगर येथील एस. एस. टी. महाविद्यालयात घेतले. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा, विविध संस्थांच्या माध्यमातून झालेल्या मॅरेथॉन अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली एक धावपटू म्हणून ओळख निर्माण केली. शिल्पा केंबळे यांचा राज्यस्तरीय व महाविद्यालयीन क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
शिल्पा यांनी फक्त धावण्यातच नाही तर कब•ाr, योगा अशा अनेक क्रीडा प्रकारात सहभाग घेत पदके पटकावले आहेत. 2018मध्ये अलिबाग, कल्याण, ठाणे, चिपळूण, कांदिवली, भोईसर, पुणे, कर्नाटक, नांदेड, 2019 मध्ये गोवा, मुंबई, गुजरात अशा अनेक ठिकाणी नियोजित 21 कि.मी. धावणे स्पर्धेत सहभाग घेत कमीत-कमी वेळ नोंदवत पदकांची कमाई केली. मुंबई विद्यापीठात त्या ‘लॉंग डिस्टन्स रनर’ म्हणून अग्रेसर आहेत. शिवाय त्यांनी धावणे स्पर्धेत मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळात क्रॉस कंट्री, हाफ मॅरेथॉन ट्रिपल चेस 4 बाय 100 रिले स्पर्धांमध्ये सहभाग घेत यश मिळवले आहे.
शिल्पा तथा सई चव्हाण यांनी राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेतही सुवर्णपदक संपादन केले आहे. तसेच गडरोहण स्पर्धेतही प्रथम, द्वितीय क्रमांक, सुवर्ण, रौप्यपदके संपादन केली आहेत. तसेच रायगडची 72 कि.मी.ची परिक्रमाही यशस्वी पूर्ण केली. तसेच रायगड धावत चढणे आणि उतरणे स्पर्धेमध्येही महिला खुल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक संपादन करून सुवर्णपदकही मिळवले आहे. अजून शिल्पा यांची धावण्याची जिद्द कायम असून त्या आता नवीन खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
पण कमी उंचीचा परिणाम
अनेकांना पोलीस, वनविभागात सेवा बजावण्याची इच्छा असते. परंतु शासकीय अटी-शर्तींपुढे त्यांचा निभाव लागत नाही. असे शिल्पा यांच्या बाबतीत देखील घडले. शिल्पा जरी राष्ट्रीय खेळाडू असल्या तरी शासकीय नियामनुसार कमी उंचीमुळे पोलीस, वनअधिकारी या पदांवर काम करणे हुकले आहे. शिल्पा या वनविभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण आहेत. परंतु आपली उंची कमी राहिल्याने त्यांच्या खेळातील परिश्रमांचे फळ अद्याप पाहिजे तसे मिळालेले दिसत नाही.
परंतु याचे दु:ख न मानता जे आपल्याला मिळालेले नाही ते आपल्या विद्यार्थी खेळाडूंना मिळावे, यासाठी त्या राजे स्पोर्टस अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण देतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये राजे अॅकॅडमीच्या माध्यमातून गावातील शाळेतील विद्यार्थ्यांकडून धावणे खेळाची तयारी करून आगरवायंगणी ते दापोली असा 21 किलोमीटरचा प्रवास सासरी असताना विद्यार्थ्यांसमवेत पूर्ण करून ऑलिंपिकच्या खेळाडूंना एक अनोख्या प्रकारची मानवंदना दिली. याशिवाय क्रीडा शिक्षक म्हणूनही शाळांमध्ये काम पाहत आहेत. त्यांना प्रत्येक स्पर्धेवेळी आई -वडिलांसोबत सासरच्या मंडळींकडून मोठे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
- प्रतिक तुपे, दापोली