दापोली-पुणे शिवशाहीला अपघात, ७ जखमी
खेड :
महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंडजवळ जाळीच्या देवाच्या ठिकाणी दापोली - पुणे शिवशाही बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून उर्वरित २९ प्रवासी अपघातातून वाचल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दापोली आगारातून सकाळी ८.३० च्या सुमारास दापोली पुणे शिवशाही बस महाड तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंड या ठिकाणी आली असता, समोरून येणाऱ्या खासगी कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारला. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली. या बसमध्ये ३१ प्रवासी होते. मात्र यातील दोन प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर प्रवाशांना मात्र किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या.
जखमींमध्ये रियाज हरसिलकर (३२, बुरोंडी,) समीक्षा सारंगे (३२, ३ पुणे,) निलोफर हरसिलकर (२६ बुरोंडी), मनिषा मनोहर महाडिक (हर्णे), नूरजहाँ रियाज हर्सिलकर (५२, दापोली), शैरीश माटवनकर (२२, काजळपुरा महाड). शमशा माटवनकर (४४, महाड) यांचा समावेश आहे.
- दोन तासानंतर याच मार्गावर पुन्हा अपघात
महाड तालुक्यातील रेवतळे गावाजवळ असलेल्या आंग्रे कोंड येथे महामंडळाच्या प्रवासी बसला अपघात घडल्यानंतर अवघ्या दोन तासात याच मार्गावर दापोलीवरून महाडच्या दिशेने येणाऱ्या कारला अपघात झाला. याच मार्गावर असलेल्या लोखंडे कोंड या वसाहती नजीक रस्त्यावर तीव्र उतार असल्याने, वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळली, सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही.