Ratnagiri Accident News : दापोली-खेड मार्गावर कारचा अपघात
11:43 AM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
दापोली : दापोली-खेड मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या एका अपघातात कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची कार (एमएच ४६ सीएच ६०५६) खेडहून दापोलीच्या दिशेने येत होती. आज पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास टाळसुरे हद्दीतील खोतवाडी ग्रामपंचायत परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील सर्व प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली.
अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिकांच्या मदतीने पार पडले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Advertisement
Advertisement