छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दापोली दुमदुमली!
दापोली :
तालुक्यातील ऐतिहासिक व गौरवशाली परंपरा जपणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नुकताच समावेश करण्यात आला. या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी दापोलीतील ज्ञानदीप संस्था आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शहरात सुवर्णदुर्ग गौरवयात्रा पार पडली. यानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने दापोली दुमदुमून गेली. ज्ञानदीप संस्था तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये व समाजात ऐतिहासिक वारशांविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबवत असते. याच अनुषंगाने संस्थेच्या मुख्य कार्यालयाजवळ सकाळी या शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथक, वाद्यवृंदाने सादरीकरण केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पाऊस असूनही विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.
या शोभायात्रेला शुभेच्छा देण्यासाठी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, नायब तहसीलदार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता, ज्ञानदीप दापोली फाउंडेशनचे सेक्रेटरी सुजय मेहता, सरोज मेहता, रितू मेहता, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुयोग मेहता, नायब तहसीलदार शरद आडमुठे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद मेहता, धर्मवीर हिंदुराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश भांबीड, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक, दापोलीतील नागरिक उपस्थित होते.
ही गौरव यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानदीप प्राथमिक विद्यामंदिर, ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर, संतोष भाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी या सर्व प्रशालेच्या सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
- शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
ही गौरव यात्रा ज्ञानदीप संस्थेच्या कार्यालयापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दापोली शहर, बुरोंडी नाका अशी काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शोभायात्रा आल्यावर विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. यावेळी शिवरायांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले..