For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : रुग्णवाहिका 'गर्भवती'ला नाकारणाऱ्या दोघांना नोटीस

12:42 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news    रुग्णवाहिका  गर्भवती ला नाकारणाऱ्या दोघांना नोटीस
Advertisement
दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे गर्भवती महिलेला वेळेत १०२ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याच्या गंभीर प्रकारानंतर आरोग्य विभागाने संबंधित दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले असून संबंधित लिपिक आणि वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
चौकशीत दोष सिद्ध झाल्यास लिपिकाची बदली, वेतनवाढ रोखणे तसेच कंत्राटी वाहनचालकाची सेवा समाप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वंजारी यांनी 'तरुण भारत संवाद'शी बोलताना दिली. आंजर्लेतील हा प्रकार शनिवारी घडला.
तालुक्यातील देहण येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज होती.
मात्र आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाने 'डिझेल नसल्यामुळे गाडी जाऊ शकत नाही' आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार दोषी लिपीक, चालकाला कारणे दाखवा असे सांगत सेवा देण्यास नकार दिला. यामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
अखेर सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी भागवत यांच्या पुढाकारातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि महिलेला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेळेत उपचार मिळाल्याने माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.   डॉ. अमित वंजारी यांनी सांगितले की. रुग्णवाहिकांसाठी इंधन भरण्याकरिता आरोग्य विभागाला बीपीसीएल कंपनीचे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तालुक्यातील गिम्हवणे येथील पेट्रोल पंपावर या कार्डद्वारे डिझेल भरले जाते. मात्र कार्ड स्वीकारणाऱ्या मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संबंधित रुग्णवाहिकेत इंधन भरण्यात अडचण निर्माण झाली होती. 
रुग्णवाहिका उपलब्ध पण... 
तालुक्यात सध्या १०८ आपत्कालीन सेवेची एक रुग्णवाहिका आणि १०२ सेवेच्या आठ रुग्णवाहिका कार्यरत असल्याची माहितीही डॉ. अमित वंजारी यांनी दिली. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध असूनही प्रशासकीय ढिसाळपणामुळे त्या वेळेवर धावू शकत नसतील, तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
Advertisement
Advertisement
Tags :

.