दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गोवा विज्ञान केंद्राला क्षेत्रभेट
विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान उपकरणे पाहण्यासह हाताळली
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली येथील कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोवा विज्ञान केंद्राला क्षेत्रभेट देऊन विज्ञानाच्या संकल्पनावर आधारीत विविध उपकरणे पाहण्यासह हाताळली. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस ) या संस्थेच्यावतीने कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड क्लब तयार केला असून भारतीय मानके विद्यार्थ्यांना समजावून सांगणे तसेच त्यांच्याविषयी जनजागृती करणे शिकवले जाते. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी दाणोली हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचा समावेश असून स्पर्धेची बक्षिसे बी आय एस ही संस्था देते.बी आय एस यांच्यावतीने दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गोवा विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विज्ञान केंद्र गोवा येथे भेट दिल्यामुळे विज्ञानाच्या संकल्पनावर आधारित विविध उपकरणे मुलांना पाहायला आणि हाताळायला मिळाली. या क्षेत्रभेटीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री जे आर पाटील तर आयोजन शिक्षक आर जी पाटील यांनी केले. यात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा समावेश होता. या क्षेत्रभेटीसाठी शाळेच्यावतीने बी आय एस चे शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांनी आभार मानले.