For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘दानिश चिकणा’च्या आवळल्या मुसक्या

05:00 PM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘दानिश चिकणा’च्या आवळल्या मुसक्या
Advertisement

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा अत्यंत जवळचा हस्तक : दाऊदच्या आशीर्वादाने मुंबईत सुरु केली ड्रग्जी फॅक्टरी, मुंबईच्या एनसीबीची हडफडे येथे यशस्वी कारवाई

Advertisement

पणजी : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा जवळचा हस्तक आणि सध्याचा मुख्य मानला जाणारा दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकणा हा अखेर गोव्यात पकडला गेला आहे. मुंबईच्या राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील हडफडे येथे मंगळवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत दानिश चिकणा याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. त्याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याच्याबरोबर असलेल्या माहिलेसह ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईची माहिती कुणालाही लागू न देता अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबविण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दानिश चिकणा याच्यासमवेत एक महिलाही होती. या अटक प्रक्रियेदरम्यान हणजूण पोलिसस्थानकाच्या महिला पोलिस पथकाची मुंबईच्या राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने मदत घेतली.

हॉटेलवरील छाप्यात आवळल्या मुसक्या 

Advertisement

दाऊद इब्राहीमच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा चिकणा हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याच्या हालचालींवर राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने लक्ष ठेवले होते. चिकणा गोव्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. हणजूण येथील एका हॉटेलमध्ये दानिश चिकणा थांबल्याचे कळताच त्या हॉटेलवर छापा टाकून त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली, असे राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने सांगितले.

चिकणाकडून 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त, महिला ताब्यात

मुंबईच्या राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने दानिश मर्चंट उर्फ चिकणा याला हडफडेतून अटक केल्यानंतर त्याच्याजवळ असलेले 200 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले. त्यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. चिकणाच्या बरोबर असलेल्या एका महिलेसही ब्युरोने ताब्यात घेतले आहे.

मुंबईत सुरु केली ड्रग्जची फॅक्टरी 

दाऊद इब्राहीमच्या टोळीच्या नेटवर्क अंतर्गत मुंबईतील डोंगरी येथे चिकणा याने ड्रग्ज फॅक्टरी चालवली होती. याची माहिती राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोला मिळाल्यानंतर त्याची चौकशी सुरु होती. दानिश चिकणा मुंबईप्रमाणेच देशाच्या इतर भागातही अमलीपदार्थाचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यात पटाईत होता. मुंबईतील डोंगरी येथे अमलीपदार्थ सिंडिकेट सुरू केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने दानिश चिकणा याला अटक केली होती. परंतु अनेकवेळा अटक होऊनही तो नवीन नेटवर्कचा वापर करून बेकायदेशीर अमलीपदार्थ नेटवर्क सांभाळत होता, असे राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने सांगितले. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचने दाऊदच्या नेटवर्कशी संबंधित तब्बल 256 कोटी ऊपयांच्या अमलीपदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दुबईतून नकत्याच प्रत्यार्पित करण्यात आलेल्या सलीम डोलाचा निकटवर्ती मोहम्मद सलीम सुहेल शेख यालाही अटक केली होती.

दानिश ‘चिकणा’ विरुद्धच्या कारवाया 

  • 2011 या साली कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित असलेल्या विविध अमलीपदार्थ उत्पादन फॅक्टरीवरील कारवाई करताना राजस्थानातून दानिश चिकणा याला मुंबईत आणण्यात आले होते.
  • 2019 सालात राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने दानिश चिकणा याच्या डोंगरी येथील अमलीपदार्थ उत्पादन युनिटचा पर्दाफाश केला आणि त्याचवेळी दानिश चिकणाला राजस्थानमधून अटक केली होती.
  • 2021 सालात कोटा पोलिस आणि राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने संयुक्त कारवाई करुन राजस्थानमधील कोटा येथून दानिशच्या आवळल्या होत्या मुसक्या.
  • नोव्हेंबर 2024 सालात मोहम्मद आशिकुर सहिदूर रहमान आणि रेहान शकील अन्सारी यांना अटक केल्यानंतर दानिश चिकणा याचे अमलीपदार्थ कनेक्शनचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती.
  • गेल्या वर्षी उघडकीस आणलेल्या एका प्रकरणातील संशयितांकडून एकूण 199 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले होते, त्याचा पुरवठादार दानिश चिकणा हाच होता.
Advertisement
Tags :

.