इक्वेडोरच्या अध्यक्षपदी डॅनियल नोबोआ
55 टक्के मतांसह मिळविला विजय
वृत्तसंस्था/ क्विटो
इक्वेडोरमध्ये अध्यक्षीय पदासाठी निवडणूक झाली असून यात डॅनियल नोबोआ हे विजयी ठरले आहेत. डाव्या पक्षांचे उमेदवार लुइसा गोंजलेज यांना पराभूत करत डॅनियल यांनी अध्यक्षपद पटकाविले आहे. रुढिवादी नेते डॅनियल यांना गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाई करणारा नेता म्हणून ओळखले जाते. कायदा-सुव्यवस्थेवरून त्यांच्या कठोर निर्णयामुळे इक्वेडोरच्या जनतेने त्यांना सर्वोच्च पदासाठी पुन्हा एकदा निवडले आहे.
या निवडणुकीचा निकाल मी मान्य करणार नाही. तसेच पुनर्मोजणीची मागणी करणार आहे. यंदा झालेली निवडणूक इक्वेडोरच्या इतिहासातील सर्वात खराब आणि सर्वात भयावह फसवणूक असल्याचा दावा पराभूत उमेदवार गोंजालेज यांनी केला आहे. सुमारे 93 टक्के मतपेट्यांमधील मतांच्या मोजणीसह नोबोआ यांना 55.8 टक्के तर गोंजालेज यांना 44.1 टक्के मते मिळाली आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या फेरीच्या उलट हा निकाल आहे. त्यावेळी नोबोआ हे गोंजालेज यांच्यापेक्षा केवळ 16,746 मतांनी आघाडीवर होते.
डॅनियल नोबोआ अजिन हे अध्यक्ष तर मारिया जोस पिंटो या उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत देखील मतदारांनी नोबोआ यांचीच निवड केली होती. तर यंदा फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या फेरीच्या निवडणुकीत नोबोआ यांना 44.17 टक्के तर गोंजालेज यांना 44 टक्के मते मिळाली होती.