जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील ओलमणीनजीकचा ‘तो’ धोकादायक वृक्ष हटविला
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल, वाहनधारकांमधून समाधान
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील ओलमणी गावानजीक रस्त्यावर कललेला व वाहतुकीला अडथळा ठरलेला तो धोकादायक वृक्ष वनखात्याने हटविल्यामुळे वाहनधारक व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जांबोटी-खानापूर हा राज्य महामार्ग जंगलमय प्रदेशातून गेला असल्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा अनेक जीर्ण झालेले वृक्ष, झाडे व झाडांच्या फांद्या, बांबूची बेटे अनेक ठिकाणी रस्त्यावर मधोमध कलल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. ओलमणी गावानजीक पाण्याच्या टाकीजवळ गेल्या अनेक वर्षापासून एक जुना वृक्ष रस्त्याच्या मधोमध कलल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी अवजड वाहने सदर वृक्षाला घासून जात असल्यामुळे अपघातांच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे हा वृक्ष हटवावा, अशी मागणी करण्यात येत होती.
गावामध्ये जांबोटी, ओलमणी, मोदेकोप, निलावडे, दारोळी आदी गावात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील उसाची उचल प्रामुख्याने लैला शुगर, खानापूर व म्हाळुंगे येथील इको केन शुगर्स कारखान्याकडून करण्यात येते. मात्र ऊस वाहतूक करताना जांबोटी-खानापूर मार्गावर रस्त्यावरील वृक्ष तसेच झाडांच्या फांद्यामुळे, ऊस वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे वृक्ष व फांद्या हटवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गांनी लोकप्रतिनिधी व वनखात्याकडे केली होती. तसेच या संदर्भात ‘तरुण भारत’च्या दि. 12 नोव्हेंबर रोजीच्या अंकात ऊस वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या त्वरित हटवाव्यात, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. वनखात्याने सदर वृत्ताची दखल घेऊन जुनाट वृक्ष व फांद्या हटविल्यामुळे वाहनधारक व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.