यंदे खूटवरील सिग्नल खांबाचा धोकादायक अवशेष हटविला
बेळगाव : अवजड वाहनाने धडक दिल्याने यंदे खूट येथील ट्रॅफिक सिग्नलचा लोखंडी खांब कोसळला होता. मात्र, खांबाचा लोखंडी पाया रस्त्यापासून सहा इंच तसाच होता. त्याचा अंदाज येत नसल्याने त्यावरून वाहने गेल्यास ती पंक्चर होण्याचे प्रकार घडत होते. ही बाब लक्षात येताच दक्षिण वाहतूक पोलिसांनी कटरच्या साहाय्याने जमिनीपासून उंच असलेला पाया कापून काढला. शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील यंदे खूट येथे रस्त्यावरच जुना सिग्नल खांब होता. त्यामुळे अवजड वाहनांना वळण घेताना तो अडचणीचा ठरत होता. काही महिन्यांपूर्वी अवजड वाहनाने धडक दिल्याने लोखंडी खांब कोसळला होता. मात्र, जमिनीपासून सहा इंचपर्यंत लोखंडी खांबाचा अवशेष होता. त्यावर पोलिसांनी दगड ठेवला होता. मात्र, सततच्या रहदारीमुळे तो अवशेष धोकादायक ठरला होता. त्यामुळे मंगळवारी रहदारी पोलिसांनी कटरच्या साहाय्याने अवशेष कापून संभाव्य धोका टाळला आहे.