आरोस बाजार रस्त्यावर धोकादायक खड्डे
न्हावेली /वार्ताहर
कोंडुरा ते आरोस बाजार मार्गावरील आरोस हायस्कूल ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी निर्माण झालेल्या खोल आणि अनियमित खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक यांचे हाल होत आहेत. मागील काही दिवसांत या ठिकाणी अनेक किरकोळ अपघातही घडले असून काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते. प्रशासनाने दखल घेत खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जवळच आरोस हायस्कूल, दांडेली ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा बँक, तलाठी कार्यालय असल्याने नागरिकांची वर्दळही भरपूर असते. सकाळी व संध्याकाळी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मार्गावरून ये-जा करतात. खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने दोन मोठी वाहने एकमेकांना चुकवितानाही अडचणी निर्माण होत असून खड्ड्यांमुळे धोका अधिक वाढला आहे.स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा हे खड्डे स्वतःच माती-खडी टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन-चार दिवसांत ते पुन्हा उघडून खोल होतात. पावसाळ्यानंतर रस्ता आणखी बिकट स्थितीत पोहोचला असून वाहतूक सुरळीत ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. ग्रामस्थ, वाहनचालक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
प्रशासकीय पद्धत बदला
एखादा गंभीर अपघात घडल्यानंतर दुरुस्तीला जाग यायची ही प्रशासकीय पद्धत बदलण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. धोकादायक खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ता उपलब्ध करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.