Satara News | पावसाळा तोंडावर अन् मुख्य वीज वाहक तारा जमिनीजवळ; साताऱ्यातील पिरवाडी परिसरातील नागरिक मृत्यूच्या छायेत
सातारा : शहरातील पिरवाडी परिसरातील मिस्त्री कॉलनीमध्ये मुख्य विद्युत वाहक तारा धोकादायकरित्या जमिनीच्या अगदी जवळ लोंबकळत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मिस्त्री कॉलनीतील मोकळ्या मैदानातून मुख्य वीजवाहक तारा जात आहेत. त्या इतक्या खाली आल्या आहेत की, एखाद्या व्यक्तीचा किंवा खेळणाऱ्या लहान मुलांचा त्यांना स्पर्श होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मैदानात दररोज मुलांचा वावर असतो. त्यामुळे कोणत्याही क्षणीतबरेज बागवान जीवितहानी घडू शकते, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, सदरबाजार येथील महावितरण कार्यालयातयाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली असून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या तारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तरीही संबंधित विभागाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी
उपस्थित केला आहे. नागरिकांनी तातडीने धोकादायक तारा खेचून सुरक्षित उंचीवर नेण्याची आणि परिसरातील वीजयंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.