विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
बेळगाव : विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. शक्ती योजनेपासून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास अधिक वाढला आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत शहरातील विविध बसथांब्यांवर ही परिस्थिती पाहावयास मिळत आहे.
याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि परिवहन मंडळ गांभीर्य कधी घेणार? हेच पाहावे लागणार आहे.शहरातील चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, आरपीडी कॉर्नर, यंदे खूट, आरटीओ सर्कल, सम्राट अशोक चौक, कॉलेज रोड आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे. अनियमित आणि अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची दैनंदिन फरफट सुरू आहे. अनेक वेळा विद्यार्थी जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याबाबत प्रशासनाला मात्र कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. शिवाय रात्री घरी पोहोचायलाही उशीर होऊ लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींची कुचंबना होत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उभा ठाकला आहे.
सकाळ-सायंकाळी तारेवरची कसरत
सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी शर्यतीसारखे धावतात. काही विद्यार्थी दरवाजाला लोंबकळतच प्रवास करताना दिसतात. सर्व बसथांब्यांवर ही परिस्थिती पाहायला मिळते. हा प्रवास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यासारखा आहे. याबाबत परिवहनकडे अनेकवेळा निवेदने देऊन बसफेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, परिवहनच्या ताफ्यातच बसेसची कमतरता असल्याने धोकादायक प्रवास सुरू आहे.