धोकादायक ‘मिल्टन’ची अमेरिकेला धडक
20 लाख लोकांना पुराचा फटका : शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ : तीन तासात 3 महिन्यांचा पाऊस
वृत्तसंस्था/फ्लोरिडा
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ‘सिएस्टा की’ शहराच्या किनारपट्टीवर गुऊवारी सकाळी मिल्टन चक्रीवादळ धडकले. या चक्रीवादळामुळे सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा येथे गेल्या एक हजार वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला. अवघ्या तीन तासात 16 इंच पाऊस कोसळला असून तो साधारण 3 महिन्यांइतका आहे. या वादळामुळे अनेक भागात मोठी पडझड झाली असून झाडे, वीजवाहिन्या आणि घरे-इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात जीवितहानीविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
फ्लोरिडाला धडकणारे मिल्टन हे वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. तसेच 15 दिवसांत फ्लोरिडाला धडकणारे दुसरे मोठे चक्रीवादळ आहे. यापूर्वी फ्लोरिडामध्ये हेलन चक्रीवादळामुळे 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील 12 हून अधिक राज्यांना हेलन चक्रीवादळाचा फटका बसला आहे. आता मिल्टन चक्रीवादळामुळे फ्लोरिडातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले आहे. त्याचवेळी, टँपा खाडीत अगदी उलट घडले आहे. प्रत्यक्षात वादळी वारे पावसामुळे तेथे भरलेले पाणी वाहून नेत आहेत. त्यामुळे पुरापासून दिलासा मिळाला आहे. सिएस्टा की किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी मिल्टन हे ‘श्रेणी 5’ चक्रीवादळ होते. मुख्य प्रभावाच्या वेळी ते ‘श्रेणी 3’ बनले आणि आता त्याला श्रेणी 2 वादळ घोषित करण्यात आले आहे. या वादळाच्या तीव्रतेमुळे ते धोकादायक संबोधण्यात आले आहे.
चक्रीवादळामुळे फ्लोरिडातील अनेक शहरांमध्ये ताशी 193 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे फ्लोरिडातील सुमारे 10 लाख लोकांच्या घरातून वीज गुल झाली आहे. तसेच 20 लाख लोकांना पुराचा धोका आहे. परिस्थिती बिकट बनली असून काही भागात लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित ठिकाणी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फ्लोरिडातील अनेक शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ह्या वादळाची तीव्रता वेगवेगळ्या भागात दोन दिवस टिकणार आहे. त्यानंतरच नुकसानीची नेमकी माहिती समोर येणार आहे. मिल्टन चक्रीवादळामुळे अमेरिकेला 8 लाख कोटी ऊपयांचे नुकसान होऊ शकते. ‘मिल्टन’ पाठोपाठ अटलांटिक महासागरात आणखी एक चक्रीवादळ ‘लेस्ली’ तयार होत आहे. मात्र, ते अमेरिकेत पोहोचण्याची शक्मयता खूपच कमी आहे.