धोकादायक घर अडकले प्रतिक्षा यादीत
मडुऱ्यातील नाईक कुटुंब राहतात जीव मुठीत धरून : अर्ध्याअधिक भिंतीत ओलावा ; घर कोसळण्याच्या स्थितीत
न्हावेली / वार्ताहर
पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असलेले मडुरा-बाबरवाडी येथील नाईक कुटुंब बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या अर्ध्याअधिक भिंतीत ओलावा निर्माण झाला असून घर केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी घरात वास्तव्य करायचे की नाही असा प्रश्न नाईक कुटुंबियांना पडला आहे.मडुरा-बाबरवाडी येथील सावळाराम लक्ष्मण नाईक यांचे घर मातीचे आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे घराच्या भिंती पूर्णपणे कमकुवत झाल्या असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सावळाराम यांची आर्थिक परिस्थितीत हलाखीची आहे. त्यांचे घर पंतप्रधान आवास योजनेच्या 'ड' यादीत 30 क्रमांकावर आहे. जोपर्यंत अगोदरची यादी पूर्ण होत नाही तोपर्यंत नाईक यांना प्रतिक्षा करत जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. पंतप्रधान आवास योजनेची 'ड' यादी उशिरा येते.गावातील घरे मातीची असतात. त्यामुळे मातीच्या घरांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. मडुरा येथे मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यामुळे घरात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे घर केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यादी पूर्ण झाल्यानंतर नाईक यांना लाभ मिळणार, मात्र तोपर्यंत दुर्घटना झाल्यास घरात राहणाऱ्या तीन व्यक्तीच्या जीवास धोका आहे.
------
प्लास्टिकच्या छताला लाकडाचा टेकू
छप्पर मोडकळीस आल्याने अनेक ठिकाणी छप्पराला गळती लागली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नाईक यांनी घराच्या छप्परावर प्लास्टिक घातले आहे. त्यामुळे घरात लागलेली गळती बंद झाली. घराच्या छप्पराला खालून लाकडाचा टेकू दिल्याने छप्पर उभे आहे. आमच्या स्वप्नाचे घर कधी मिळणार अशा विवंचनेत सावळाराम नाईक आहेत.
---------
सावळाराम नाईक यांच्या घराची स्थिती धोकादायक आहे. 'ड' यादीत जरी नाव असले तरी वरिष्ठ पातळीवर नाईक यांच्या घराला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- बाळू गावडे, उपसरपंच, मडुरा
------------
आम्ही राहत असलेल्या घराच्या मातीच्या भिंती अर्ध्याअधिक ओल्या झाल्या असल्यामुळे त्या कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यादीतील आमचा नंबर येईपर्यंत आम्हावर बेघर होण्याची वेळ येईल असे दिसते.
- सावळाराम नाईक, घरमालक