मांडवीत घातक ‘फेकल कोलिफाॅर्म’ जीवाणू
कॅसिनोंच्या परिसरात सापडल्याने चिंता : आरोग्य, पर्यावरणीय अहवाल सादर करा, कोर्टाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश
पणजी : मांडवी नदीमध्ये पणजीत ज्या भागांमध्ये ऑफशोअर कॅसिनो आणि पर्यटनाशी संबंधित जहाजे उभी आहेत, त्या भागांमध्ये ‘फेकल कोलिफॉर्म’ जीवाणूंची पातळी लक्षणीयरित्या वाढल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून यासंबंधी अहवाल सादर करण्याचा आदेश गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. ‘फेकल कोलिफॉर्म’ हे जीवाणू माणसांसाठी, जलचरांसाठी तसेच प्राण्यांसाठी धोकायदायक आहेत. वाढत्या जलप्रदूषणाच्या चिंतेची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाने मळा तलावातील माशांच्या मृत्यूच्या समस्येवरील स्वत:हून दाखल केलेल्या जनहित याचिकेची व्याप्ती वाढवून त्यात मांडवी नदीचा समावेश केला आहे.
कॅसिनो परिसरात ‘फेकल कोलीफॉर्म’
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मांडवी नदीमध्ये, विशेषत: ज्या भागांमध्ये ऑफशोअर कॅसिनो आणि पर्यटनाशी संबंधित जहाजे उभी आहेत, त्या भागांमध्ये ‘फेकल कोलिफॉर्म’ जीवाणूंची पातळी लक्षणीयरित्या वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
प्रदूषणाची पातळी दुप्पट
प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, नदीच्या काही विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी मर्यादेच्या जवळपास दुप्पट वाढली आहे. संभाव्य आरोग्य आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन, न्यायालयाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मळा तलावात सांडपाण्याची गळती?
पणजीत मळा तलावातील जलसाठ्यात मृत मासे सापडल्याप्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने शेजारील मलनिस्सारण प्रकल्प अथवा स्थानिक रहिवाशांकडून तलावात सांडपाण्याची गळती झाली काय? याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. पणजी शहरातील मळा भागात असलेल्या तलावामध्ये मृत मासे तरंगताना दिसण्याच्या चिंताजनक प्रकाराबाबत स्वत:हून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने काल बुधवारी सुनावणी घेतली. अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी पणजी मनपा आयुक्त, मच्छीमार खाते आणि सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाने संयुक्तरित्या तपासणी करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यात, मनपा आयुक्तांना प्रत्येक घराची तपासणी करण्याचे आणि ज्या घरांतून तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळले, ती घरे तात्काळ सील करण्याचे निर्देश देण्यास सांगितले.
सांडपाणी तलावात सोडल्याबद्दल घरांना नोटिसा
यावेळी मनपाच्या वकिलांनी सांगितले, की मळा तलावाच्या शेजारील सुमारे 200 पैकी 31 घरांना सांडपाणी खुल्या नाल्यात अथवा तलावात सोडल्याबद्दल नोटिसा दिल्या असून त्याची माहिती आरोग्य खात्यालाही देण्यात आली आहे. तलावाच्या शेजारीच असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पमधून गळती अथवा स्थानिक रहिवाशांकडून सांडपाणी सोडले जात आहे का, यापैकी एकातून गळती होत असून याची तपासणी करा आणि अहवाल सादर करा, असे न्यायालयाने प्रदूषण मंडळाला सांगितले आहे.