For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोका..! तरीही नाही सुटका !

10:57 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
धोका    तरीही नाही सुटका
Advertisement

बेळगाव : त्याच्यापासून मानवी समूहाला, प्राणीमात्रांना, जलचरांना किंबहुना संपूर्ण निसर्गालाच धोका आहे, हे माहीत असूनही त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. हे प्रेम म्हणावे, गरज म्हणावी, सोय म्हणावी की अपरिहार्यता? हा कोणता घटक आहे, जो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याचे उत्तर कोणीही सहज देऊ शकेल. तो घटक आहे प्लास्टिक! प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोठेही नजर टाकली, अगदी बसमध्ये, रेल्वेमध्ये, बाजारपेठेत, सेलमध्ये, मॉलमध्ये सर्वत्र प्लास्टिकचा वापर सर्रास दिसून येत आहे. जेव्हा प्लास्टिक अस्तित्वात आले, तेव्हा आधुनिक जगाची अत्यंत महत्त्वाची गरज प्लास्टिकने भागवली. म्हणून संपूर्ण जगच आनंदीत झाले आणि झपाट्याने प्लास्टिकचा वापर वाढू लागला. परंतु, याच प्लास्टिकमुळे मानवी समूहाबरोबरच प्राणीमात्रांचे जीवनही धोक्यात येणार आहे, याची कल्पनाच त्यावेळी आली नाही. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण म्हटले, की पाण्याची स्वच्छता, कचरा उचल इथपर्यंतच मर्यादित विचार केला जातो. फार फार तर ठिकठिकाणी पावसाळ्याच्या दरम्यान रोपलागवड केली जाते. परंतु, सर्वाधिक प्रदूषण ज्या प्लास्टिकमुळे होत आहे, त्याचा विचार सहसा आपण करत नाही. प्रशासन आणि महानगरपालिकासुद्धा त्याबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न करत नाही.

Advertisement

आपल्या घरात आणि बाहेर वापरल्या जाणाऱ्या किंवा अस्तित्वात असणाऱ्या प्लास्टिकचा विचार केल्यास साध्या सुपारीच्या वेस्टनापासून मोठमोठ्या उपकरणांच्या आच्छादनापर्यंतची यादी हजारोंनी वाढत जाईल. लेज, कुरकुरे यांचा अतिरिक्त वापर घातक असूनही ते पदार्थ खाल्ले जातातच, त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. त्याचबरोबर या वरच्या वेस्टनांचे करायचे काय? हा प्रश्न येतोच. ही यादी तयार केल्यास एक पानसुद्धा पुरणार नाही. परंतु, सर्वाधिक धोकादायक प्रदूषण आहे ते म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्सचे. त्यांची विल्हेवाट कशी लावली जाते? हा एक गंभीर प्रश्न आहे. सॅनिटरी पॅड्स सोयीचे आहेत. परंतु, समाजासाठी ते गैरसोयीचे ठरले आहेत. त्याबाबत शालेय वयामध्येच मुलींना कोणतेही योग्य प्रशिक्षण दिले जात नाही. त्याचबरोबर बिसलरी बाटल्या यांचा कचरा काय करायचा? हाही प्रश्न आहे.  आज बिसलरी बाटल्यांशिवाय कोणताच समारंभ होत नाही. परंतु, हे पाणी नेमके कोठून आणले जाते? याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. त्या बाटल्यांचा पुनर्वापर परत पाणी भरण्यासाठीच केला जातो का? अशी एक शंका अलीकडे घेतली जात आहे. त्यावर उपाय म्हणून बिसलरी बाटल्यातील पाणी प्याल्यानंतर बाटलीचे बूच पुन्हा बाटलीत घालावे. जेणेकरून त्याचा पुन्हा पाणी भरण्यासाठी उपयोग करता येत नाही, असा संदेश सर्वत्र फिरत आहे. परंतु, तितकी कृतीसुद्धा करणे आपल्याला शक्य नाही. ही उदासीनता चिंताजनक आहे.

ना प्रशासन, ना समाज प्लास्टिकमुक्तीसाठी आग्रही

Advertisement

प्लास्टिक ही गरज पण आहे. ताडपत्री, विविध आच्छादनांसाठी मोठमोठ्या पॅकिंगसाठी प्लास्टिक हाच उत्तम पर्याय आहे, असे मानले तरी त्यासाठीचे काही मानक अंमलात आणायला हवेत. दुर्दैवाने महानगरपालिका याबाबत वर्षभरात कधी तरी मोहीम राबवते आणि पुन्हा सर्व काही थंडावते. त्यामुळे ना प्रशासन, ना समाज, ना नागरिक, प्लास्टिकमुक्तीसाठी आग्रही आहेत.

प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय कायदा बंधनकारक

प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्याबाबत ‘युनायटेड नेशन्स इन्व्हिरॉनमेंट’ संस्थेने आंतरराष्ट्रीय कायदा बंधनकारक केला. त्यावर 190 देशांनी सह्या केल्या. परंतु, प्रत्यक्षात त्याचीही अंमलबजावणी फारशी झालेली नाही. शास्त्रज्ञ आणि तज्ञ डॉक्टरांच्या मते आता प्लास्टिकचे कण मासे, पक्षी, गायी याबरोबरच मानवी शरीरात जात आहेत. प्रामुख्याने फुफ्फुसामध्ये प्लास्टिकचे कण गेल्याने फुफ्फुस रोगाच्या समस्या वाढल्या आहेत.

...तर आपण प्लास्टिकमुक्त समाज करूच शकणार नाही

शोभेच्या अगणिक वस्तू प्लास्टिकच्याच आहेत. मातीच्या कुंड्यांऐवजी प्लास्टिकच्या कुंड्या आल्या. जेवणाच्या ताटांऐवजी प्लास्टिक प्लेट आल्या. ग्लास आले. परंतु, किमान काही गोष्टी आपण टाळू शकतो. फक्त त्यासाठीची मानसिकता आणि गांभीर्य आपल्याला यायला हवे. बेळगावच्याच पर्यावरणवादी आरती भंडारे यांनी भाजीविक्रेत्यांनी प्लास्टिकच्या ग्लास किंवा कपातून चहा पिऊ नये यासाठी त्यांना स्टीलचे कप दिले. विक्रेत्यांनी कप घेतले, पण अवघ्या काही दिवसातच पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत प्लास्टिक ग्लास सुरू केले. हीच गोष्ट त्यांनी महाप्रसादासाठी दिलेल्या स्टील्सच्या प्लेट्सची आहे. इतकी उदासीनता असेल तर आपण प्लास्टिकमुक्त समाज करूच शकणार नाही.

प्लास्टिक अपरिहार्य ठिकाणी कामगारांना मास्क देणे आवश्यक

आंतरराष्ट्रीय करारानुसार जेथे प्लास्टिकचा वापर अपरिहार्य आहे, अशा बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना मास्क देणे आवश्यक आहे. जेथे धूळ असेल अशा ठिकाणी कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जावी, असेही सुचवण्यात आले आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून आपण अत्यंत साधे उपाय करू शकतो. कापडी पिशव्या नेणे हे स्टेटसला शोभत नाही, असे म्हणणेच हास्यास्पद आहे. त्याचबरोबर पार्सल नेताना सोबत डबे नेणे यामध्ये कोणताही स्टेटस सिम्बॉल नाही. उलट आपले अनुकरण दुसरे करतील, या पद्धतीने प्रयत्न व्हायला हवेत. प्लास्टिक आपल्या आयुष्यातून पूर्णपणे जाणे शक्य नाही. पण जेथे त्याला पर्याय उपलब्ध आहेत, तेथे त्या पर्यायांचा स्वीकार करणे आपल्या हाती नक्की आहे.

पर्याय...!

  • बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाणे
  • प्लास्टिकच्या ग्लासऐवजी स्टीलच्या कपातून पाणी, चहा घेणे
  • स्ट्रॉचा वापर शक्यतो कमी करणे
  • मुलांना प्लास्टिकऐवजी स्टीलचे डबे व बाटली देणे
  • पॅक फूड, पार्सल फूडऐवजी जातानाच डबे घेऊन जाणे
  • बांबू, माती, काच या धातूपासून बनविलेल्या उपकरणांचा वापर करणे
Advertisement
Tags :

.