कॅम्प येथे गतिरोधकाअभावी धोका वाढला
बेळगाव : कॅम्प येथील गतिरोधक खराब झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. भरधाव येणारी वाहने न थांबता वेगाने जात असल्याने धोका वाढला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा गतिरोधक घालावा, अशी मागणी कॅम्पमधील रहिवाशांमधून होत आहे. फिश मार्केटपासून उभा मारुती मंदिरापर्यंत रस्ता अरुंद आहे. त्यातच कॅम्पमधून एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहनांची ये-जा सुरू असते. भरधाव येणारी वाहने वेगाने पुढे जात असल्यामुळे अनेक लहानमोठे अपघात कॅम्प येथे झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी एका शाळकरी विद्यार्थ्याला अवजड वाहनाने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन करून गतिरोधकाची मागणी केली होती. सुरुवातीला रबरयुक्त गतिरोधक बसविला. परंतु अवजड वाहनांमुळे तो खराब झाला. त्यानंतर डांबरी गतिरोधक घातले होते. ते देखील खराब झाले आहेत. या गतिरोधकांवरून दुचाकी सरकून अपघात होत आहेत. कोणताही मोठा अपघात होण्यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड व इतर विभागांनी गतिरोधक घालण्याची मागणी केली जात आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना धोका
या परिसरात आठ ते दहा शाळा आहेत. बुधवारपासून पुन्हा शाळा भरणार आहेत. सकाळी व सायंकाळी कॅम्प येथील बसथांब्यावर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे कॅम्प येथे गतिरोधक उभारण्याची मागणी केली जात आहे.