पथदीपांच्या खुल्या वीजवाहिन्यांमुळे धोका वाढला
बेळगाव : दत्त गल्ली वडगाव येथील डेकोरेटीव्ह पथदीपांच्या वीजवाहिन्या धोकादायक स्थितीत होत्या. या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्या वीजवाहिन्यांचा धोका निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती महानगरपालिकेला दिली. यामुळे डोळे उघडलेल्या मनपा प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी पोहचून वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली. शहरातील डेकोरेटिव्ह तसेच इतर पथदीप धोकादायक स्थितीत आहेत. काही ठिकाणी वीजवाहिन्या खुल्या असल्याने विजेचा धक्का बसत आहे. चार महिन्यांपूर्वी दत्त गल्ली वडगाव परिसरात पथदीपाच्या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता. यानंतरही या परिसरात पथदीप धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते रमेश देसूरकर यांनी खुल्या वीजवाहिन्या पाहून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ दत्त गल्ली वडगाव येथे पोहचत वीजवाहिन्यांची दुरुस्ती करत वीज खांबाला चिकटपट्ट्या लावल्या. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून आले.