दांडीच्या समुद्रात दुर्मिळ ‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ पक्षी जखमी अवस्थेत आढळला; मच्छिमारांसह पर्यावरण संस्थांची तत्परता; कांदळवन विभागाकडे सुरक्षित सुपूर्द

मच्छिमारीवरून परतत असताना बाबू उर्फ श्रीराम आडकर यांना समुद्राच्या पाण्यात जखमी अवस्थेत पडलेला हा पक्षी दिसला. नाना रोगे यांनी तत्काळ त्याचे रेस्क्यू करून श्रीकृष्ण उर्फ आबा आडकर यांच्या स्वाधीन केले. यावेळी नारायण आडकर आणि भूषण आडकर उपस्थित होते. पक्षी आढळल्याची माहिती आडकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेला दिली.
माहिती मिळताच संस्थेचे भार्गव खराडे आणि इकोमेट्सचे निखिल नेरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती कांदळवन विभागाला दिली. कांदळवन विभागाचे वनक्षेत्रपाल, सिंधुदुर्ग महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडे आणि नेरकर यांनी मानस आडकर यांच्याकडून पक्षी ताब्यात घेतला आणि कांदळवन विभागाच्या कार्यालयात सुरक्षितपणे सुपूर्द केला.
दुर्मिळ समुद्री पक्ष्याची वैशिष्ट्ये
विल्सनचा स्टॉर्म पेट्रेल हा आकाराने लहान समुद्री पक्षी असून त्याची लांबी साधारण 17 ते 19 सेंटीमीटर आणि पंखांचा विस्तार 38 ते 41 सेंटीमीटर असतो. त्याचे शरीर गडद तपकिरी-काळसर असून शेपटीजवळ पांढरा ठळक डाग असतो. चोच लहान, काळी आणि टोकदार असते. चोचीच्या वरच्या भागातील नळीदार नाकपुड्या हे या पक्ष्याचे विशेष वैशिष्ट्य आहे.
हा पक्षी समुद्राच्या पृष्ठभागावर आढळणारे क्रिल, लहान मासे, स्क्विड आणि अन्य सूक्ष्म समुद्री जीव खातो. पाण्याच्या पृष्ठभागावर पायांनी हलके स्पर्श करत अन्न टिपण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे तो समुद्रावर चालत असल्याचा भास निर्माण होतो.
अंटार्क्टिका आणि आसपासच्या बेटांवर प्रजनन करणारा हा पक्षी प्रजननानंतर अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांतून स्थलांतर करतो. खडकांच्या भेगांमध्ये किंवा बिळांत घरटे करून मादी साधारण एक अंडे घालते. नर आणि मादी दोघेही अंडे उबवण्याची जबाबदारी पार पाडतात.
दुर्मिळ समुद्री पक्ष्याला मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे आणि विविध संस्थांच्या समन्वयातून सुरक्षितता मिळाल्याने पर्यावरणप्रेमींकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
