Satara News : बागणी शाळेच्या विद्यार्थिनींचा शिवजयंतीनिमित्त नृत्यसौंदर्य प्रदर्शन
नागनाथ मंदिरात शिवकन्यांनी बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली
बागणी- बागणी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळा नंबर दोनच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित किल्ला भाग येथील नागनाथ मंदिरात शिवकन्यांनी बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
सुरुवातीस तहसीलदार राजशेखर लिंबारे, राजेश राजपुत, सरपंच तृप्ती हवलदार, उपसरपंच संतोष घनवट, मुख्याध्यापिका शमा महाबरी, अपर्णा ढोले, शिवाजीराव ढोले, अर्चना माने, प्रवीण एटम, संदीप पाटील, शारदा मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक विविध शिवकालीन गाण्यांवर आपले नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. तहसीलदार लिंबारे म्हणाले आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.
शालेय विद्यार्थ्यांना महापुरुषांचा इतिहास समजून घेणे व त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या युगात महापुरुषांचे महत्व टिकवून ठेवणे हे फक्त शाळांमधूनच घडू शकते. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी दिलेले बलिदान हे आपण कधीच विसरून चालणार नाही त्यामुळे शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना घडवत असताना महापुरुषांच्या कार्याची सविस्तर माहिती त्यांना देणे आवश्यक आहे. यावेळीं ईश्वरपूर बाजार समितीच्या संचालिका अपर्णा ढोले, मुख्याध्यापिका शमा महाबरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारी, महसूल सेबक मोठ्या संख्येने उपस्थित होते.