‘दाना’ शमले, दक्षतेमुळे हानी मर्यादित
ओडिशा सरकारच्या तत्परतेमुळे नागरिक सुरक्षित
► वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडिशाच्या सागरतटाला धडकलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ आता शमले आहे. त्यामुळे विशेष हानी झाली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ओडिशा सरकारने वादळ येण्यापूर्वीच केलेल्या उपाययोजनांमुळे या राज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू या वादळामुळे झालेला नाही. पश्चिम बंगालमध्ये मात्र एक व्यक्ती प्राणास मुकली आहे. दोन्ही राज्यांमधून विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात एका आठवड्यापूर्वी निर्माण झालेले हे चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या आसपास ओडिशाच्या सागरतटीय क्षेत्रावर धडकले. पश्चिम बंगालच्या तटीय क्षेत्रालाही याचा तडाखा काही प्रमाणात बसला. मात्र, भूमीवर प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्याचा जोर कमी झाला. सहा तासांनंतर ते पूर्णत: शमल्याची माहिती देण्यात आली. ओडिशात या वादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू ओढवला.
ओडिशाच्या चार जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून 110 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू लागले होते. तटीय क्षेत्रातील अस्थायी बांधकामे या वादळामुळे धाराशायी झाली. तसेच अनेक झोपड्या आणि झाडे उन्मळून पडली. तथापि, सहा लाख लोकांना आधीच सुरक्षितस्थळी पोहचविण्याची व्यवस्था केली गेल्याने जीवितहानी टाळण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती देण्यात आली.
चार जिल्ह्यांमध्ये वित्तहानी
ओडिशाच्या भद्रक, केंद्रपाडा, बालासोर आणि जगतसिंगपूर या चार जिल्ह्यांमध्ये या वादळामुळे काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हानी मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या जिल्ह्यांच्या तटीय क्षेत्रात 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहिल्याने काही झाडे आणि कच्ची घरे पडली. मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने वीजपुरवठा काही काळ बंद होता. मात्र, दूरसंचार सेवा खंडित झाली नाही. राज्य सरकारने हानीचा आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे. ती मर्यादेबाहेर नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये 1 ठार
पश्चिम बंगालच्याही चार जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला. मात्र, या राज्यापर्यंत पोहचेपर्यंत ते बरेच कमजोर झाले होते. या राज्याची राजधानी कोलकाता येथे प्रचंड पाऊस झाल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. कोलकात्यात अनेक स्थानी पाणी तुंबल्याने 500 हून अधिक घरे पाण्याखाली गेली. कोलकाता विमानतळावरुन विमानांची उ•ाणे गुरुवारपासूनच बंद ठेवण्यात आली होती. ती शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा सुरु करण्यात आली. दुपारनंतर वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर मार्ग वाहतुकही सुरु करण्यात आली होती. वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला आहे.
शून्य जीवितहानीचे प्रतिपादन
या वादळात जीवितहानी शून्य प्रमाणात करण्याचे आमचे ध्येय होते. ते साध्य करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केले आहे. वादळाची तीव्रता लक्षात घेऊन आधीपासूनच दक्षता घेण्यात आली होती. आपत्कालीन साहाय्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. सहा लाख लोकांना सुरक्षितस्थानी हालविण्यात आले होते. तसेच आरोग्य यंत्रणाही तयार होती. राज्य सरकारने तत्परतेने केलेल्या या सज्जतेमुळे वित्तहानीचे प्रमाण मर्यादित राहिले, अशी माहितीही मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये हानी
पश्चिम बंगालच्या 20 परगाणा जिल्ह्यात या वादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वादळ घेंघावू लागले तेव्हा ही व्यक्ती केबलचे काम करीत होती. वेगवान वाऱ्यामुळे घराच्या छतावरुन पडून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. 2 लाख लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले असून आता स्थिती पूर्वपदावर येत आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वादळाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनेही सज्जता केली होती. राष्ट्रीय आपदा निवारण प्राधिकरणाच्या काही तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. तसेच अर्धसैनिक दलांनाही सज्ज राहण्याचा आदेश केंद्रीय गृह विभागाने दिला होता.
सावधगिरीचा लाभ...
ड वादळपूर्व दक्षता घेतल्याने ओडिशात जीवितहानी टाळण्यात यश
ड पश्चिम बंगालमध्ये 1 व्यक्तीचा मृत्यू, अनेक घरे-झाडे कोसळली
ड भूमीला थडकल्यानंतर 6 तासांनी वादळ कमजोर, व्यवहार पूर्ववत
ड भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळांवरुन विमानो•ाणांना प्रारंभ