दामू नाईक दिल्लीला, गावडेंची भेट लांबणीवर
सोमवारनंतरच राजकीय घडामोडींची शक्यता
पणजी : भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक हे पुन्हा दिल्ली येथे गेल्यामुळे त्यांची मंत्री गोविंद गावडे यांच्याशी होणारी काल शुक्रवारची भेट लांबणीवर पडली असून ती आता सोमवारी होणार आहे. त्यामुळे मंत्री गावडेंवरील कारवाईचा विषय तीन दिवस पुढे गेला आहे. नवी दिल्ली येथे भाजपतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आखण्यात आला असून नाईक त्यासाठी दिल्लीला गेले आहेत. रविवारपर्यंत ते तेथे थांबणार असून गावडेंवरील कारवाईबाबत ते केंद्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नाईक हे रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी सकाळी लवकर गोव्यात दाखल होणार असून त्याच दिवशी (सोमवारी) ते गावडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. गावडेंची बाजू ऐकून घेतल्यानंतर कारवाईसंदर्भात पुढील निर्णय होणार आहे.
मंत्री गोविंद गावडे यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणी झाली असून घटकराज्य दिनाच्या पणजीतील कला अकादमीतील कार्यक्रमात गावडे हे सावंत यांच्या शेजारी बसले होते. ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्याचे दिसून आले. आता फक्त नाईक यांच्याशी बोलणी होणे बाकी असून त्यानंतरच गावडेंवरील कारवाईचा फैसला केला जाणार आहे. सावंत आणि नाईक या दोघांनी गावडेंवर कारवाई करण्याची हमी दिली असून त्यांच्यावरील कारवाई रोखण्यासाठी ‘उटा’ तसेच बहुजन महासंघ या संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे आता कारवाई करायची की नाही हे ठरविणे भाजपसाठी मोठी कसोटी ठरणार आहे.