दामू नाईक यांनी घेतली पंतप्रधानाची भेट
गोव्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा, पाठिंबा लाभणार असल्याची ग्वाही
मडगाव : भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी काल बुधवारी दिल्लीत संसद भवनात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व गोव्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधानाची भेट घेणारे दामू नाईक हे पहिले प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. या भेटीच्या दरम्यान, दामू नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. गोव्यात लवकरच मंत्री मंडळ फेरबदल होणार असून त्या दृष्टीकोनातूनही चर्चा केली. गोव्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी मार्गदर्शन व पाठिंबा मांगितला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला आपला सदैव पाठिंबा व मार्गदर्शन लाभणार असल्याची हमी दामू नाईक यांना दिली. गोव्यात सुरू असलेल्या विकासकामांवरही या भेटीच्या दरम्यान चर्चा झाल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.