दामू नाईक भाजपचे कप्तान!
प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड : आज अधिकृत घोषणा,संधीचे सोने करण्याचे प्रयत्न करेन : दामू
पणजी : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी ख्याती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनण्याची संधी मिळणे हे मी भाग्य समजतो. या संधीचे सोने करण्याचे सदोदित प्रयत्न करेन, असे प्रतिपादन दामू नाईक यांनी केले. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या निवड प्रक्रियेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या गाभा समिती बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात या पदासाठी एकमेव अर्ज सादर झाल्याने नाईक यांची निवड बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी असून आज शनिवारी सकाळी पणजीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
पुढे बोलताना नाईक यांनी देशात सुमारे 15 कोटी आणि गोव्यात 4.5 लाख सदस्य असलेल्या या महान पक्षाचा आपण एक सामान्य कार्यकर्ता आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या पक्षाशी संबंधित आहे. या दरम्यान पक्षासाठी पूर्ण निष्ठा आणि सन्मानाने कार्य केले आहे. त्याची पावती आज या पदाच्या माध्यमातून आपणास मिळाली आहे. यासाठी सर्वप्रथम आपण तमाम कार्यकर्त्यांचे ऋण मानतो, असे सांगितले. त्याचबरोबर स्व. मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मिकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर यासारख्या महान नेत्यांनी हा पक्ष मोठा करण्यात दिलेल्या योगदानासाठी कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांचे कार्य त्याच परंपरेने पुढे नेण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नाईक म्हणाले.
या पदासाठी अनेक नावे पुढे आली होती. मात्र तो पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेचा भाग असतो. त्यातून ज्या कुणाच्या गळ्यात ही माळ पडते तो ती आनंदाने स्वीकारतो व त्यात कोणाप्रतीही आकस, द्वेषभावना नसते. यापूर्वीच्या निवडीवेळीही आपले नाव होते. परंतु तेव्हा संधी मिळाली नाही म्हणून पक्षाशी फारकत घेतली, दूर राहिलो, असे प्रकार न करता आपल्या वाट्याला आलेले कार्य करत राहिलो. आज ती संधी मिळाली, असे एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले. देश प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय आपण स्वत: या तत्वावर या पक्षाची ध्येयधोरणे चालतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रोत्साहन मिळते. मी स्वता:ही त्याचाच एक भाग आहे याचा अभिमान आहे. अशावेळी सर्व ज्येष्ठ, श्रेष्टांचे मार्गदर्शन मिळवत पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचे प्रयत्न करेन, असे नाईक यांनी सांगितले. केवळ निवडणुका जिंकणे हा एकच अजेंडा या पक्षाकडे नसतो. संघटन वाढविणे, त्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणारे नव्या दमाचे कार्यकर्ते तयार करणे हे पक्षसंघटनेचे मुख्य काम असते. त्यातून संघटना सदृढ बनल्यास सर्व निवडणुका सहज जिंकता येतात, ध्येय साध्य करता येते. त्यामुळे एखाद्या पदापेक्षा संघटन बळकट होणे महत्वाचे आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.