मुरगावात आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव
त. भा. प्रतिनिधी
वास्को : प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. वर्षपद्धतीप्रमाणे दुपारी 12.30 वा. जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून 24 तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला विधिवत प्रारंभ होईल. बुधवारी दुपारी गोपाळ काल्याने या उत्सवाची भक्तिभावाने सांगता होईल.
भजनी सप्ताह उत्सव समितीने पत्रकार परिषदेत यंदाच्या भजनी सप्ताह उत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सप्ताह उत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, उत्सव समितीचे अध्यक्ष भरत कोलगावकर, उपाध्यक्ष प्रशांत लोटलीकर, सचिव सुरेश नाईक, खजिनदार प्रकाश गावस उपस्थित होते.
भाविकांना सोयीस्कररित्या दर्शन घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक भाविकांचीही दर्शनासाठी विशेष दखल घेण्यात येईल अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. भजन सप्ताहाच्या प्रारंभी दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत तसेच भजन सप्ताहाच्या समाप्तीवेळी मंदिरातील भाविकांच्या प्रवेशावर मर्यादा असणार आहेत. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
सायंकाळी निघणार पारंपरिक पार
मंगळवारी दुपारी भजनी सप्ताहाला प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंडीसह विविध समाजाचे पार श्रीदामोदर मंदिराकडे मार्गस्थ होतील. पहाटेपर्यंत हे पार मंदिराकडे येऊन श्रीचरणी श्रीफळ अर्पण करतील. मुरगांव पत्तन न्यास फैलवाले कामगार संघ, नाभिक समाज, दैवज्ञ ब्राह्मण समाज, बाजारकर समिती, विश्वकर्मा ब्राह्मण समाज व गाडेकर समाज यांच्यातर्फे ही परंपरा पाळली जात असून या समाजांतर्फे शहरात ठिकठिकाणी पहाटेपर्यंत संगीत मैफलींच्या बैठका रंगतील. या समाजांनी प्रसिद्ध गायक व वादक कलाकारांना आमंत्रित केले आहे.
भजनी सप्ताह उत्सवाची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. मुरगाव पालिका, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस खाते, आरोग्य खाते, अग्निशामक दल तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यानेही मागील पंधरा दिवसांपासून व्यवस्था व सुसज्जतेच्या कामात सहकार्य केलेले आहे. भजनी सप्ताह उत्सव समितीनेही व्यवस्थेचे कार्य पूर्ण केले आहे.
चोवीस तास चालणार साखळी भजन
दुपारी दोन वाजल्यापासून श्री दामोदर मंदिरामध्ये अखंड 24 तास साखळी पद्धतीने स्थानिक भजनी पथकांची भजने होतील. त्यात बेलाबाय भजनी मंडळ, त्रिमूर्ती भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, कलादीप भजनी मंडळ (महिला), लक्ष्मी नारायण भजनी मंडळ, त्रिशूल खाप्रेश्वर भजनी मंडळ, मुशेले कला मंडळ, शिवप्रासादिक भजनी मंडळ, साईबाबा भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, ॐकार भजनी मंडळ, संतोषी माता भजनी मंडळ, स्वरब्रह्म भजनी मंडळ, श्री गजानन सेवा समिती, शनैश्वर भजनी मंडळ, शिवसमर्थ भजनी मंडळ, राष्ट्रोळी भजनी मंडळ, ओरूले दत्तवाडी भजनी मंडळ, मधुकर मांजरेकर भजनी मंडळ, राजाराम भजनी मंडळ, ॐ विष्णू कला भजनी संस्कृती संस्था, शारदा संगीत विद्यालय, गणपती पंचायतन भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ आदी भाग घेणार आहे.
वरील भजने साई आर्टस्, अॅड. राजन नाईक, हिरा केतन ठक्कर, उमेश साळगांवकर, अनिल सातार्डेकर, राजेंद्र डिचोलकर, अॅङ ज्ञानेश्वरी अशोक नाईक, भोसले काफेतारिया, राजेश शेट्यो, परेश प्रभाकर शेट तानावडे, विष्णू गारोडी, शैलेंद्र गोवेकर, श्री कामाक्षी ऑफसेट प्रिंटर, संतोष खोर्जुवेकर, भरत कोलगावकर. अशोक मांद्रेकर, एम.व्ही. शेट्यो, प्रकाश गावस, दिनेश गावडे यांनी पुरस्कृत केलेली आहेत.
बुधवारी गोपाळकाल्याने होणार सांगता
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सर्व पार व दिंड्यांचे दामोदराच्या सालाकडे आगमन होईल. त्यानंतर सकाळी उशिरा श्रीफळ विसर्जनासाठी टाळ मृदंगाच्या गजरात बाल गोपाळ समुद्राकडे निघतील. श्रीफळ विसर्जन करून झाल्यानंतर सर्व बाल गोपाळ मंदिरात दाखल झाल्याबरोबर गोपाळ काला, आरत्या, तीर्थप्रसाद होऊन 24 तासांच्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची सांगता होईल.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे मुरगांव हिंदू समाजातर्फे यंदाही अन्नप्रसाद सेवा विद्याधिराज भवनच्या मागे दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदु समाजातर्फे करण्यात आले आहे.