सतर्क रहा! कोल्हापुरात वीज कोसळण्याचा धोका; Damini aap चा वापर कसा कराल?
नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि परिसरात वीज कोसळण्याचा धोका वाढला असून 'दामिनी : लाईटनिंग अलर्ट' अॅपच्या माहितीनुसार कोल्हापुरात पुढील काही मिनिटांत वीज कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दामिनी अॅपवरील नकाशानुसार, कोल्हापूर शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात 7 ते 21 मिनिटांच्या आत वीज कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर, कागल, इचलकरंजी, उरण इस्लामपूर, निपाणी आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर वीज पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सावधगिरीचे उपाय :
- घराबाहेर असाल तर सुरक्षित जागी शिरा.
- झाडांखाली किंवा उघड्यावर थांबणे टाळा.
- विजेच्या उपकरणांपासून दूर राहा.
- मोबाईल वापरणे टाळा, विशेषतः उघड्यावर.
'दामिनी' अॅपची भूमिका :
हवामान खात्याच्या ‘दामिनी’ अॅपमार्फत वीज कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची माहिती वेळेवर दिली जाते. हे अॅप सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असून, ते वीज पडण्यापूर्वी अलर्ट देते. त्यामुळे दुर्घटनांचा धोका कमी होतो.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक व प्रवाशांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी काय करावे?
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती 'दामिनी: लाईटनिंग अलर्ट' अॅपवरील आकडेवारीवर आधारित असून, हवामानातील बदलानुसार परिस्थिती बदलू शकते. नागरिकांनी नियमितपणे अधिकृत हवामान माहितीवर लक्ष ठेवावे.