हत्तींनी जमीनदोस्त केलेला भेडला माड शाळेवर कोसळून नुकसान
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यातील घोटगे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावरणाऱ्या हत्तींच्या कळपाने अखेर मोठा अनर्थ घडवला आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ लगत असलेला भेडला माड शाळेवर कोसळून घातला. यात शाळेच्या इमारतीसह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसान झालेले साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे व शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली.पाच हत्तींचा एक कळप मागील काही दिवसांपासून घोटगे परीसरात वावरत आहे. हा येथील शेतकऱ्यांच्या शेती व फळबागायतींचे हे हत्ती अतोनात नुकसान करत आहे. हत्तींचा कळप दिवसाढवळ्या लोकवस्तीत वावरत आहे. गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा कळप घोटगे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ उपद्रव माजवत होता. शाळेच्या इमारती लगत असलेला भेडला माड हत्तींनी शाळेवर कोसळून घातला. यात शाळेचे छप्पर, भिंत व आतील संगणक, लॅपटॉप व इतर साहित्याची मोडतोड झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. वनविभागालाही याची कल्पना दिली. मात्र अधिकारी उशिरा आल्याने ग्रामस्थांनी काही नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभाग व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हत्तीचा वावर असलेल्या भागात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
तात्काळ साहित्य उपलब्ध करून द्यावे...
घोटगे गावातील शाळा ही अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमुख ठिकाण असून, अशा प्रकारची आपत्ती शिक्षणासाठी गंभीर अडचण ठरू शकते. हत्तींसाठी हाकारी नेमले आहेत. मात्र ते हत्तींना रोखण्यात अपयशी ठरत आहेत. हत्तींमुळे नुकसान झालेली शाळेची इमारत व आतील साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत