आचरा - डोंगरेवाडीत छप्परावर अवतरली रानडुक्कराची स्वारी
कौलारू छप्पराचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
आचरा : प्रतिनिधी
डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगरेवाडी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रानडुक्कराने घराच्या छप्परावर उडी मारत मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी पहाटे सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.आचरा डोंगरेवाडीतील डोंगरावरून शेतमळे भागाकडे जाणाऱ्या रानडुकराचा अंदाज चुकला आणि उंच डगरीलगत असलेल्या घरांच्या छप्परावर त्याने उडी घेतली. ग्रामस्थ बाबा देसाई यांच्या घराच्या छप्परावर उडी मारली. या जोरदार उडीमुळे घरावरील कौले फुटून पोटमाळ्यावर कोसळली. पहाटेच्या शांत साखरझोपेत अचानक झालेल्या आवाजाने देसाई कुटुंबीय घाबरून बाहेर धावले. छप्परावर रानडुक्कराची स्वारी पाहताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर ते रानडुक्कर उडी मारत मळे भागाच्या दिशेने पसार झाले.डोंगरेवाडी ही एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण पाणथळ मळा अशा भौगोलिक रचनेत वसलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी डोंगरातून खाली उतरत असल्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र घराच्या छप्परावर रानडुक्कराने उडी मारल्याची घटना प्रथमच घडल्याने ग्रामस्थांनी सांगितले. वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीकडे वाढते आगमन ही चिंतेची बाब ठरत असून संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.