For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाडलोसमध्ये गव्यांकडून वायंगणी शेतीचे नुकसान

03:38 PM Jan 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पाडलोसमध्ये गव्यांकडून वायंगणी शेतीचे नुकसान
Advertisement

गव्यांच्या कळपाने पीक तुडविले; शेतकरी मेटाकुटीला

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
पाडलोस केणीवाडा येथे वायंगणी भातशेतीचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. त्यामुळे केलेला सर्व खर्च व मेहनत वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गव्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत. तर वनविभाग पर्यायाने सरकारच्या हातात पंचनामा करण्यापलिकडे काही उरले नसल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.मडुरा पंचक्रोशीतील अनेक गावात गव्यांच्या उपद्रवामुळे शेकडो एकर जमीन पडीक आहे. मात्र, पाडलोस केणीवाडा व न्हावेली- रेवटेवाडी परिसरात वायंगणी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मंगळवारी मध्यरात्री गव्यांचा कळप शेतकरी सूर्यकांत नाईक यांच्या शेतात घुसला व दोन महिने केलेली मेहनत व सर्व खर्च गव्यांनी पायदळी तुडवला. हातभर उंचीला आलेले वायंगणी भात पीक यापुढे कसे वाढणार अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे. यापुढे शेती करावी की सोडावी याचे उत्तर उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरलेल्या प्रशासनाने द्यावे असे शेतकरी समीर नाईक यांनी सांगितले. दरम्यान, शेतीच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस उपाययोजना आखावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सरकारचे दुर्लक्ष : महेश कुबल
गव्यांकडून सतत होत असलेल्या शेती आणि बागायतीच्या नुकसानीमुळे मडुरा पंचक्रोशीतील भात, नाचणीसोबत भाजीपाला, आंबा, काजू, बांबूसह सर्वच पिके अडचणीत आली आहेत. आतापर्यंत काही मोजक्या गावांत नुकसान करणाऱ्या गव्यांचे कळप आता बहुतांश गावांत पोहोचले असून त्यांचा बंदोबस्त करुन पिके वाचवण्याकडे सरकारचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख (ठाकरे) महेश कुबल यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.