न्हावेलीत एक एकरावरील वायंगणी भात शेतीचे गव्यांकडून नुकसान
सलग चार दिवस गव्यांचा शेतात वावर : बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली रेवटेवाडी येथे शेतकऱ्याचे सुमारे एक एकर क्षेत्रातील वायंगणी भात शेतीचे गव्या रेड्याने नुकसान केले आहे. सलग चार दिवस भात शेतीत गवा वावरल्याने दोन महिन्यांच्या केलेल्या मेहनतीवर तसेच सर्व खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अशा उपद्रवी प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व शेतकऱ्याला स्वकष्टाची शेती करण्यास सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी प्रसाद सुधीर परब यांनी केली आहे. दांडेली येथील प्रसाद सुधीर परब यांनी न्हावेली- रेवटेवाडी येथे आपल्या शेत जमिनीत वायंगणी भातशेती केली आहे. गेले चार दिवस रात्री किंवा पहाटे एक भला मोठा गवारेडा येऊन पिकाची नासधूस करत आहे. अशा उपद्रवी प्राण्यांपासून भात शेतीचे संरक्षण करण्यासाठी बाजूला कापडे बांधण्यात आली आहेत. परंतु याला न घाबरता गवे शेतात उतरतात व नुकसान करतात. सद्यस्थितीत आमचे हजारो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाने अशा उपद्रवी प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रसाद सुधीर परब यांनी केली आहे.
शेतीचे संरक्षण करा
एकीकडे शेकडो एकर जमीन उपद्रवी प्राण्यांमुळे पडीक ठेवण्यात येते तर दुसरीकडे न्हावेली रेवटेवाडी सारख्या भागात दांडेली येथुन येऊन भात शेती केली जाते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रशासनाने शेती करण्यास पर्यायाने उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करून सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.