धामणेत भात पिकाचे नुकसान
परतीच्या पावसाचा धुमाकूळ
वार्ताहर/धामणे
यंदा भात पेरणीपासून संपूर्ण पावसाळा तीन ते साडेतीन महिने दमदार पाऊस पडल्याने देसूर, सुळगा (ये), राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, धामणे या भागातील भातपिक व इतर सोयाबिन, भुईमूग, बटाटा, रताळी ही सर्व पावसाळी पिके उत्तम होती. दसऱ्यानंतर भात पिकाच्या कापणीला या भागातील शेतकरी सुरुवात करणार होते. परंतु गेल्या 10 ते 12 दिवसांपासून परतीच्या वळीव पावसाने दररोज हजेरी लावल्याने कापण्यासाठी आलेले भात पीक आडवे पडले असून भात पिकावरुन पावसाचे पाणी वाहत असल्याने या भागातील शेतकऱ्यांची झोप मात्र उडाली आहे. कारण उत्तम आलेले हे पीक आता पाण्यात कुजून बाद होत असून हाताला आलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणात होत असलेली नासाडी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे.
यंदा धामणे, सुळगा(ये) येथील शेतकऱ्यांनी बासमती भात पिकाची पेरणी जास्त केली आहे. परंतु बासमती भातपिकांचे रोप बारी असतात व ते पोसवलेली भाताचे लोंबे वजन होते. त्यामुळे हे भात पीक कापण्याआधी पावसाचे व वाऱ्याचे प्रमाण अत्यंत अल्प राहिले पाहिजे. परंतु भातपिकाची कापणी सुरू करण्यापूर्वीच गेल्या 10 ते 12 दिवसांपासून परतीचा पाऊस दररोज पडून त्यावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन दिवसांत सुरू असलेला पाऊस कमी न झाल्यास पीक हाताला लागणे कठीण असल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
देसूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील शेतकऱ्यांचे भात व ऊस ही दोन्ही पिके जास्त प्रमाणात लागवड केली जात आहे. त्यामुळे आता भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने येथील शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
धामणे, राजहंसगड, नागेनहट्टी येथील शेतकऱ्यांना भात पिकांबरोबर रब्बी पिकासाठी शेतजमीन उत्तम आहे. त्यामुळे येथील शेतकरी सोयाबीन, भुईमूग, बटाटा, रताळी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यंदाही ही पिके या भागात उत्तम होती. दसरा उत्सवापासून ही पिके काढण्याच्या कामाला सुरुवात करत असतानाच परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने 60 टक्के ही पिके पावसाने खराब झाली असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकंदरीत सर्व पिके चांगली येवूनसुद्धा निसर्गाच्या या खेळामध्ये शेतकरी हरला आहे.
भातपीक खाराब झाल्याने लाखोंचे नुकसान
देसूर शिवारात 6 एकर शेतीत यंदा भात पीक चांगले आले होते. परंतु देसूर शिवारातील भात पिकावर करपा रोग पडला असून आता दररोजच सुरु असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे येथील शिवारातील भात पीक आडवे पडत आहे. अधिक पावसामुळे पीक पाण्याखाली जाऊन कुजत आहे. यंदा भात पीक मिळण्याची शाश्वतीच नाही. 6 एकर जमिनीतील भात पीक खराब झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.