गुंजीत हत्तीकडून भात पिकाचे नुकसान
खळ्यातील भात, भातगंजी, उभे पिकही फस्त : हत्तीच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/गुंजी
गुंजी परिसरात गेल्या महिन्याभरापासून हत्तींचा उपद्रव सुरूच असून दररोज वेगवेगळ्या शिवारात शिरून शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान नित्याचेच ठरलेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून अनेक शेतकऱ्यांचे भात पिक पूर्णपणे हत्तींनी चिखलात तुडवून घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या आठवड्यापासून या परिसरात असलेल्या पाच हत्तींनी बिंबेगाळी शिवारात उच्छाद मांडला असून या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. बुधवारी या भागातील शेतकरी ज्ञानेश्वर कामतगेकर यांनी दिवसभर मळणी करून रात्र झाल्याने हत्तींच्या धास्तीने सर्व भात खळ्यावर झाकून ठेवून घरी आले होते. मात्र हत्तींनी मळणी करून ठेवलेले भात रात्री फस्त केलेच, शिवाय झाकलेल्या ताडपत्र्या फाडून टाकल्या. तसेच बुट्ट्या, सूप आदी सर्व साहित्य मोडून टाकले. रचून ठेवलेल्या दोन भातगंज्या खाऊन विस्कटून टाकल्या. त्याचबरोबर अर्धा एकरमध्ये उभ्या पिकात लोळून ताव मारून तुडवून चिखलामध्ये जमीनदोस्त केल्याने सदर शेतकऱ्याचे दीड एकरातील जवळजवळ 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले आहे.
वास्तविक कामतगेकर यांनी आपल्या शेतीभोवती झटका करंट जोडून वर्षभर जंगली प्राण्यांपासून आपल्या पिकांचे संरक्षण केले होते. मात्र ऐन सुगीत मळणी केलेले भात, त्याचबरोबर कापणी करून रचून ठेवलेल्या भातगंज्या आणि उभ्या पिकाचीही आलेल्या पाच हत्तींनी मोठ्या प्रमाणात खाऊन हानी केल्याने ते हतबल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वीच त्यांच्या अलीकडच्या शेतीमध्येही हत्तींनी प्रचंड नुकसान केले होते आणि पुन्हा दुसऱ्या शेतीमध्येही हत्तींनी त्यांचे नुकसान केल्याने ते चिंताग्रस्त बनले आहेत. आपल्या पिकाचे जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने त्यांनी जवळजवळ 40 हजार रुपये खर्चून झटका करंटची सोय आपल्याबरोबरच शेजारील शेतकऱ्यांना करून दिली होती. मात्र हत्तींनी सदर झटका करंटचे खांब पाडून शिवारात प्रवेश करून त्यांचे संपूर्ण नुकसान केल्याने ते हवालदिल झाले आहेत. सदर बाब वन खात्याच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे.
हत्तींची धास्ती कायम
अद्याप या भागात हत्तींनी ठाण मांडल्याने त्यांची धास्ती कायम असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण या भागातील अद्यापही जवळ जवळ 25 टक्के भात कापणी शिल्लक असून काही जण मजुरांच्या तुटवड्यामुळे तर काहीजण भात परिपक्व होण्यासाठी भात कापणीसाठी उशीर करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर अर्ध पक्व भात पीक कापून घरी आणण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. येथील शेतकरी वर्ग हत्तीच्या या उपद्रवाला पुरता कंटाळला आहे. मात्र अरण्य खात्याने हत्ती हटाव मोहीम अद्यापही हाती न घेतल्याने शेतकऱ्यातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.