मडवाळ येथील भातपिकाचे हत्तींच्या कळपाकडून नुकसान
नऊ हत्तींचा कळप असल्याचा अंदाज : शेतकरी चिंताग्रस्त, ऐन सुगीत भातकापणीत व्यत्यय
खानापूर : गेले पंधरा दिवस जळगा, चापगाव, कारलगा, हडलगा भागात हत्तींनी धुमाकूळ घालून भातपिकाचे प्रचंड नुकसान केले होते. नागरगाळी वनक्षेत्रात दांडेली जंगलातून नऊ हत्तींचा मोठा कळप मडवाळ येथे रविवारी दुपारी दाखल झाला आहे. या हत्तीच्या कळपाने मडवाळ परिसरातील शेतातील भातपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. ऐन सुगीच्या वेळीच हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी हतबल आणि भयभीत बनले आहेत. हत्तींच्या भीतीमुळे भातकापणी करायला शेतकरी भीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या वनखात्याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडूनही प्रयत्न होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नागरगाळी वनक्षेत्रात हत्तींचे ठाण
सध्या भाताची सुगी जोरदार सुरू आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक कापून मळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत शेतकरी लागला आहे. अशातच गेल्या महिन्याभरापासून टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला आहे. पंधरा दिवसांपूर्वी, चापगाव, हडलगा, कारलगा भागात हत्तीने धुमाकूळ घालून ऊस आणि भातपिकाचे प्रचंड नुकसान केले होते. रविवारी दुपारपासून दांडेली जंगलातून 9 हत्तींचा कळप तालुक्यातील नागरगाळी वनक्षेत्रात दाखल झाला आहे. या कळपाने कापणीला आलेल्या भातपिकात धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात भातपिकांचे नुकसान केले आहे. यात मडवाळ येथील राजू यल्लाप्पा बिलगावडे, रामू कोमाणी दळवी यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हत्तींनी केले आहे.
नागरगाळी वन अधिकाऱ्यांकडून हत्तीला पिटाळण्याचे प्रयत्न
याबाबतची माहिती भाजपकार्यकर्ते बाबासाहेब देसाई यांनी दिल्यानंतर नागरगाळीचे वनाधिकारी आणि कर्मचारी मडवाळ येथे दाखल झाले. हत्तींच्या कळपाला जंगलात परतून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच कळपातून मागीलवर्षी टस्कराने चुकून नंदगड जंगलातून निलावडेत दाखल झाला होता. तोच हत्ती आठ महिन्यांपासून या भागात धुमाकूळ घालत आहे. आता 9 हत्तींचा कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरपाई नको पण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नागरगाळी, जांबोटी, कणकुंबी परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती करणे बिकट बनले आहे. गवे, चित्तळ, रानडुक्कर, बिबटा यासह इतर प्राण्यांमुळे शेती धोक्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षण कायद्यामुळे बंदूक चालवण्यावरही निर्बंध आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यानंतर वनखात्याकडून अत्यंत तुटपुंजी नुकसानभरपाई देण्यात येते. ती मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ती नुकसानभरपाई नकोशी झाली आहे. आम्हाला नुकसानभरपाई नको, मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.