वडगाव येथील सरकारी शाळेतीलइलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान
समाजकंटकांकडून मराठी शाळा लक्ष्य : कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी शाळेतील विद्युतवाहिन्या तसेच साहित्याचे नुकसान केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वडगाव येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 31 मधील वर्गखोलीच्या बाहेर लावण्यात आलेला विजेचा बल्ब तसेच वीजपुरवठा करण्यासाठी असलेल्या वीजवाहिन्या यांचे नुकसान करण्यात आले होते. काही समाजकंटकांकडून असा प्रकार सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दिवाळी सुटीमध्ये शाळा बंद असल्याचा फायदा घेत असे प्रकार केले जात आहेत. शहरात सरकारी शाळांच्या परिसरात रात्रीच्या वेळी अनेक अवैध प्रकार सुरू आहेत. काही समाजकंटकांकडून मद्यपान करून त्या ठिकाणीच बाटल्या फोडणे, शैक्षणिक साहित्य लांबविणे, नुकसान करणे असे प्रकार वारंवार सुरू आहेत. त्यातच आता येळ्ळूर कॉर्नर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा येथील इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सरकारी शाळांच्या खुल्या जागांवर तसेच मैदानांमध्ये रात्रीच्या वेळी समाजकंटकांकडून हैदोस घातला जात आहे. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी तरुणांकडून क्रीडांगणाचा वापर केला जातो. परंतु, त्यावेळी शाळेच्या काचा व इतर साहित्याचेही नुकसान केले जात आहे. अशाच काही जणांकडून हे कृत्य घडले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शैक्षणिक साहित्याचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
यापूर्वीही कुलूप तोडण्याचे प्रकार
वडगाव येथील 31 नंबर शाळेमध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत. यापूर्वी कॉम्प्युटर लॅबचे कुलूप तोडून साहित्य लांबवल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी शहापूर पोलीस स्थानकात शिक्षकांनी तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवस हे प्रकार बंद होते. परंतु, पुन्हा असे प्रकार सुरू झाल्याने शिक्षकदेखील वैतागले आहेत. त्यामुळे अशा समाजकंटकांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.